पहिल्या कसोटीसाठी फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला बाहेर ठेवून राहुलला संधी दिली. राहुलला फक्त २० धावा करता आल्या. यासाठी त्याने ७१ चेंडू खेळले. दुसऱ्या बाजूला गिलने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शतक केले होते. गिल सोबत सलामीला आलेल्या राहुलने तेव्हा ४ डावात ५७ धावा केल्या होत्या.
राहुलने २०१४ साली भारतासाठी कसोटी पदार्पण केले. त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. पण एकूणात त्याचे रेकॉर्ड देखील पाहावे लागेल. ४६ कसोटीतील ७९ डावात राहुलने ७ शतक आणि ३४.०७च्या सरासरीने २ हजार ६२४ धावा केल्या आहेत. भारतासाठी कसोटीत २६ खेळाडूंनी त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात फक्त कपिल देव, आर अश्विन आणि सैयद किरमानी यांची सरासरी राहुल पेक्षा खराब आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तिघेही मुख्य फलंदाज नाहीत.
२०१८ पासून खराब कामगिरी
राहुलने पदार्पणानंतर २०१७ पर्यंत २१ कसोटी ४४.६२च्या सरासरीने १ हजार ४२८ धावा केल्या होत्या, यात ४ शतक देखील होती. पण त्यानंतर त्याची कामगिरी घसरली. २५ कसोटीत राहुलने २६.५७च्या सरासरीने १ हजार १९६ धावा केल्या. एप्रिलमध्ये राहुल ३१ वर्षाचा होईल. संघ व्यवस्थापन त्याच्या भविष्याचा विचार करेल असे वाटत नाही.
गेल्या १० डावात…
केएल राहुलने कसोटीतील गेल्या १० डावात फक्त एकदा २५ हून अधिक धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने २३,८,१२,१०,२२,२३,१०,२ आणि २० अशा धावा केल्या आहेत. कसोटी करिअरच्या पहिल्या १० डावात राहुलने २ शतक केली होती. पण अन्य ८ पैकी ७ डावात १० धावा देखील त्याला करता आल्या नव्हत्या. राहुलच्या कामगिरीत सातत्य दिसत नाहीय.
घरच्या मैदानावर राहुलने १५ कसोटीत ४३.५च्या सरासरीने ९०५ धावा केल्या, यात एक शतकाचा समावेश आहे. परदेशातील ३१ कसोटीत ६ शतक केली आहेत. पण ३०.६९ च्या सरासरीने १ हजार ७१९ धावा केल्या आहेत. याचा अर्थ शतक वगळता इतर डावात तो लवकर बाद झालाय. यामुळेच त्याची सरासरी ३०ची आहे.
अन्य खेळाडूवर अन्याय
अजिंक्य रहाणेची कसोटीतील सरासरी ३८.५२, मयांक अग्रवालची ४१.३३, शिखर धवनची ४०.६१ तर नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या मुरली विजयची ३८.२८ इतकी आहे. हे सर्व संघाबाहेर आहेत. मुरलीला तर २०१८ नंतर संधीच मिळाली नाही. धवन आणि रहाणे यांच्यासाठी देखील संघाचे दरवाजे जवळ जवळ बंद झालेत. पण राहुल मात्र खेळतोय आणि माहिती नाही किती काळ खेळेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times