रविंद्र जाडेजावर नेमका आरोप काय?
फिरकीपटू रवींद्र जाडेजाने ६ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. पुनरागमनाच्या सामन्याच्या पहिल्याच डावात जाडेजाने ५ बळी घेऊन आपल्या फिरकीची जादू दाखवली. मात्र, यादरम्यान जाडेजाची एक कृती वादात सापडली. सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या बोटावर क्रीमसारखे काहीतरी लावताना जाडेजा दिसल्याने त्याच्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने शंका घेतली. तसेच जाडेजाने बॉल टेम्परिंग करण्याचा प्रयत्न केला, असे आरोपही केले.
आयसीसीची जाडेजावर कारवाई!
रवींद्र जाडेजाला नागपूरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या पातळी १ चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रवींद्र जडेजाने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट स्टाफच्या आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२० चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळ भावनेच्या विरोधात आचरण करण्याशी संबंधित आहे.
हे प्रकरण नेमके काय?
भारत आणि पाहुण्या ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जाडेजाने बोटावर क्रीम लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असताना जाडेजा बोटावर क्रीम लावत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. बोटाला किंवा तोंडाला क्रीम लावणं नियमाचं उल्लंघन नाही पण बॉल हातात ठेवून बोटाला क्रीम लावल्याने जाडेजावर बॉल टेम्परिंगचे आरोप झाले.
आरोपांनंतर स्वत: जाडेजा आणि कर्णधार रोहित शर्माला सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने बोलावून घेतले. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे याप्रकरणी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी टीम इंडियालाही समन्स बजावले होते. टीम इंडियाचा कर्णधार रोहितने या प्रकरणाची वास्तविकता मॅच रेफरींना सांगितली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times