नागपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वी टीम इंडियाचा डाव ४०० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन संघाने केवळ १७७ धावा केल्याने भारतीय संघाला तब्बल २२३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ही आघाडी पार करुन भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया आव्हानात्मक धावसंख्या उभारेल, अशी आशा ऑस्ट्रेलियन चाहत्यांना होती. पण चाहत्यांच्या आशा ऑसी संघाने धुळीला मिळवल्या. ऑस्ट्रेलियन संघ पत्त्याचा बंगला कोसळावा तसा कोसळला. कॅरम बॉलचा जादूगार आर अश्विनसमोर ऑस्ट्रेलियन संघाने गुडघे टेकले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अवघ्या ९१ धावांवर ऑलआउट केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या २ तासात संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ऑलआऊट झाला.
महत्त्वाची आणि अधोरेखित करण्याची बाब म्हणजे ज्या नागपूरच्या खेळपट्टीवरुन ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय नियामक मंडळावर गंभीर आरोप केले, भारतीय फिरकीपटूंना मदत करेल, अशी खेळपट्टी मुद्दामहून बनविल्याचा आरोप करुन ऑस्ट्रेलियन मीडियाने खळबळ उडवून दिली. त्याच खेळपट्टीवर भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करुन धावांचा डोंगर उभा केला.
कर्णधार रोहितने शानदार शतक झळकावले. रवींद्र जाडेजाने ७० धावा केल्या तर अक्षर पटेलने ८४ धावा केल्या. याशिवाय तळाचा फलंदाज मोहम्मद शमीने मोक्याच्या क्षणी आक्रमक पद्धतीने ३७ धावा केल्या. खेळपट्टीत जर गोलंदाजांना अनुकूल बनवली असती तर भारतीय फलंदाज देखील संकटात सापडले असते पण तसं झालं नाही. भारतीय खेळाडू संकटात सापडले नाही, संकटात सापडले ऑस्ट्रेलियन चाहते आणि मीडिया…
ज्या खेळपट्टीवरुन भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बदनाम करण्याचा डाव ऑस्ट्रेलियन मीडिया आणि चाहत्यांनी आखला. त्यांचा तोच डाव भारतीय खेळाडूंनी पद्धतशीरपणे उधळला..!
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times