सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर

स्मृती श्रीनिवास मानधना जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्सपैकी एक आहे. १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत जन्मलेली स्मृती ओपनिंग बॅट्समन आहे. जून २०१८ मध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI) तिला सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून सन्मानित केलं होतं. याशिवाय स्मृतीला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. स्मृतीने वयाच्या अतिशय लहान वयातच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. ती केवळ दोन वर्षांची असताना महाराष्ट्रातील सांगलीतील माधवनगरमध्ये आली होती.
सांगलीतून भारतीय क्रिकेट संघापर्यंतचा प्रवास

सांगलीतच स्मृतीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तिचे वडील आणि भाऊदेखील जिल्हा स्तरावर सांगलीतून क्रिकेट खेळले आहेत. याच दोघांना पाहून स्मृतीला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. स्मृती केवळ नऊ वर्षांची असताना तिची निवड महाराष्ट्रातील अंडर-१५ संघात झाली होती. त्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी ती महाराष्ट्राच्या अंडर-१९ टीमचा भाग बनली. स्मृती मानधनासाठी महाराष्ट्रातील सांगलीतून भारतीय क्रिकेट संघापर्यंतचा प्रवास अतिशय खास होता. स्मृती मानधना भारतीय संघापर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या भावाचा श्रवणचा मोठा हात आहे.
आवडच तिचं करिअर ठरलं

स्मृतीचा भाऊ श्रवण आणि वडील सांगलीच्या जिल्हास्तरीय क्रिकेट संघातून खेळत होते. स्मृतीचे वडील आणि भाऊ सरावासाठी नेट्सवर जायचे त्यावेळी स्मृतीदेखील त्यांच्यासोबत असायची. हळूहळू हीच आवड तिचं करिअर ठरलं. वडिलांना डाव्या हाताने बॅटिंग करताना पाहून स्मृतीनेही त्याच हाताने खेळण्यास, बॅटिंग करण्यास सुरुवात केली. ११ व्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या अंडर-१९ संघात निवड झाली, पण खेळण्याची संधी तिला दोन वर्षांनी मिळाली.
राहुल द्रविड यांच्याशी खास नातं

२०१३ मध्ये अंडर-१९ क्रिकेट टुर्नामेंटमध्ये गुजरातविरोधात १५० चेंडूवर नाबाद २२४ धावा करत स्मृतीने पहिलं यश मिळवलं होतं. या यशाचं टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी स्मृतीच्या खेळीचं नातं आहे. स्मृतीच्या या सामन्याआधी स्मृती मानधनाच्या भावाला राहुल द्रविडशी भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी द्रविडने एक बॅट मागितली होती. द्रविडनेही आपल्या किटमधून एक बॅट काढून स्मृतीच्या भावाला दिली होती. स्मृतीच्या भावाने या बॅटवर द्रविडचा ऑटोग्राफही घेतला होता.
राहुल द्रविड यांनी दिलेल्या बॅटने खेळली सामने

स्मृतीने या बॅटने अंडर-१९ गुजरातविरुद्धच्या सामन्यात द्विशतक केलं होतं. त्यानंतर स्मृतीने पुढे कित्येक वर्ष याच बॅटने खेळत चांगली कामगिरी केली. चार ते पाच वेळा तिने या बॅटची दुरुस्ती केली, पण तिने या बॅटने खेळणं सोडलं नाही. २०१३ मध्ये तिने भारतासाठी खेळण्यासाठी डेब्यू केला आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मागील १० वर्षात स्मृतीने वनडे आणि टी२० मध्ये भारतीय संघासाठी मोठी कामगिरी केली. आतापर्यंत तिने ७७ वनडे सामन्यात ३ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times