दिल्ली कसोटीमध्ये नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. तर भारताच्या डावात अक्षर पटेल, विराट कोहली, अश्विनच्या खेळीने भारताला २६२ धावांचा आकडा गाठता आला. त्यामुळे त्यांना १ धावेची लीड मिळाली. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला १ बाद ६२ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ट्रेव्हिस हेड आणि लाबुशेन मैदानात होते. सामना सुरु होताच अश्विनने ट्रेव्हिस हेडला बाद करत विकेट्सची रांग सुरु करून दिली आणि नंतर पाहता पाहता अश्विन आणि जडेजाने कांगारूंचा सुफडा साफ केला. अश्विन आणि जडेजाने दमदार गोलंदाजी करत पुढच्या कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
अश्विनने या सामन्यात ३ विकेट तर जडेजाने तब्बल ७ विकेट घेत ऑस्ट्रेलियाला चांगलेच नमवले. जडेजाने ७ पैकी ५ विकेट क्लीन बोल्ड करत मिळवले. यात कुहेनमन, कमिन्स आणि हॅंड्सकोम्ब यांना खातेही उघडू न देता पॅव्हेलियनमध्ये धाडले. तर आश्विनच्या फिरकीपुढे स्मिथ आणि रेनेशॉ हतबल होत मैदानाबाहेर गेले. जडेजाने १२.५ षटकांत ७ विकेट्स घेत केवळ ४२ धावा दिल्या आणि सर्वात कमी षटकांत जास्त विकेट्स घेणारा भारताचा गोलंदाज ठरला.
भारताच्या डावात रोहित आणि केएल राहुलने सामन्याची सुरुवात केली. राहुल १ धाव घेत झेलबाद झाला तर नंतर रोहितने शानदार फटकेबाजी करत २ षटकार आणि ३ चौकार लगावत २० चेंडूत ३१ धावांची वादळी खेळी केली आणि धावबाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर संघासाठी धावा गोळा करत बाद झाले. नंतर पाचव्या विकेटसाठी आलेल्या श्रीकर भरतने २२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारत झटपट २३ धावा केल्या. तर पुजाराने नाबाद राहत ४ चौकार मारत ३१ धावांची खेळी खेळली आणि भारताला तिसऱ्या दिवशीच मोठा विजय मिळवून दिला. पुजाराने शानदार अंदाजात त्याच्या १०० व्य कसोटी सामन्याचा शेवट केला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times