ऑकलँड: आयपीएल २०२३चे वेळापत्रक जाहीर झाले असून सर्व संघांनी नव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. अशाच एका चॅम्पियन संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. लिलावात ज्या खेळाडूसाठी एक कोटी रुपये मोजले आणि संघात घेतले तोच आता आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.

मुंबई इंडियन्सनंतरचा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला हंगाम सुरू होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा जलद गोलंदाज काइल जेमिसनला दुखापत झाली असून आता त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. जेमिसनला कंबरेची दुखापत झाली होती. ज्यामुळे तो ९ महिने मैदानातून बाहेर होता. जेमिसन इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटीत संघात परत येईल असे वाटत होते. पण दुखापतीतून बाहेर येण्यासाठी अजून त्याला थोडा कालावधी लागणार आहे.

२८ वर्षीय जेमिसनने जून २०२२ मध्ये अखेरची कसोटी खेळली होती. आता मैदानावर परत येण्यासाठी त्याला ३-४ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जेमिसनने या महिन्यात इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडकडून सराव सामना खेळला होता. तो लवकरच राष्ट्रीय संघाकडून खेळू शकले असे वाटले होते पण दुखापतीमुळे पुन्हा मैदानाबाहेर जावे लागले. जेमिसनवर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. जगातील अनेक खेळाडूंना अशा प्रकारच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी वेळ लागला आहे. आम्ही त्याला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी हवा तितका वेळ देणार आहोत कारण तो एक स्टार खेळाडू आहे, असे न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले.

विराटला बाद देण्यावरून वाद; ड्रेसिंग रुममध्ये पूर्ण टीम इंडिया भडकली, तिसऱ्या अंपायरने…
काइल जेमिसन आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार होता. महेंद्र सिंह धोनीच्या संघाने त्याला लिलावात १ कोटी रुपयांत संघात घेतले होते. पण आता तो संपूर्ण हंगामात खेळणार नसल्याचे समोर आल्याने सीएसके संघाला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईची पहिली लढत ३१ मार्च रोजी होणार आहे. ही हंगामातील पहिलीच लढत आहे आणि चेन्नईची लढत विद्यमान विजेते गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. दरम्यान अशीही चर्चा सुरू आहे की कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा हा अखेरचा हंगाम असू शकतो. ४१ वर्षीय धोनीचा चेन्नई संघात खेळाडू म्हणून हा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here