भारतीय चाहत्यांना याची कल्पना आहे की बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तो आशिया कप आणि टी-२० वर्ल्डकप २०२२ खेळू शकला नाही. १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप संघात त्याचा समावेश केला होता. फिटनेस असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो २३ आणि २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील अखेरच्या दोन लढती खेळला होता. तीन दिवसांनी तिरुवनंतपूरम येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात बुमराह दिसला नाही. तेव्हा त्याच्या दुखापतीचे वृत्त समोर आले. बुमराहला बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत असल्याचे निदान झाले होते आणि त्यामुळे त्याला टी-२० संघातून बाहेर करण्यात आले. आता याबाबत आणखी अपडेट अशी आली आहे की तो ६ महिने क्रिकेट खेळू शकणार नाही.
पाठीच्या दुखापतीवर मात करण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी बुमराह न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथे गेला होता. तेथून समोर आलेल्या माहितीनुसार बुमराहवर झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.रोवन स्काउटन यांनी याबाबतची अपडेट दिली. एका बाजूला शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती समोर येत असताना दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला धक्का देकील बसला आहे. कारण बुमराह ६ महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. ज्याचा सर्वात मोठा फटका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराह वनडे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे.
भारतीय गोलंदाजीची धार
२९ वर्षीय जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतासाठी ३० कसोटी, ७२ वनडे आणि ६० टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १२८, १२१ आणि ७० विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. स्पर्धेत १२० सामन्यात ७.३९च्या इकॉनमीने १४५ विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times