संघाचा कर्णधार ऋषभ पंत त्याच्या दुर्दैवी अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. अपघातात झालेल्या दुखापतीमुळे पंतला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे संघापुढे मोठं आव्हान होतं. नुकतच व्यवस्थापनेने ऑस्ट्रेलयाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. तर भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल हा संघाचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे. आता या दोघांची जोडी दिल्लीला विजय मिळवून देईल का याकडे सर्वांच लक्ष आहे.
संघाची जबाबदारी
आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद मिळाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ‘ऋषभ दिल्ली कॅपिटल्सचा एक शानदार कर्णधार होता आणि आम्हा सर्वाना त्याची कमतरता भासेल. मी संघ व्यवस्थापनेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे. जो त्यांनी नेहमी माझ्यावर दाखवला आहे. ही फ्रेंचायझी माझ्यासाठी घरासारखी आहे.”
सौरव गांगुली नव्या भूमिकेत
भारतीय क्रिकेट बोर्डचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर सौरव गांगुलीला दिल्लीमधील आपले पॅड सोडावे लागले होते. सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्स या संघाचा मार्गदर्शक या भूमिकेत होता. पण आता यंदाच्या आयपीएलसाठी सौरव गांगुली पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत आपल्याला दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ संचालक या भूमिकेत आता सौरव गांगुली दिसणार आहे.
दिल्लीच्या संघातील या नव्या भूमिकेत आल्यानंतर गांगुली म्हणाला, ‘गेल्या काही महिन्यांपासून महिला संघ आणि प्रिटोरिया कॅपिटल्सशी माझा चांगला संबंध राहिला आहे. मी दिल्ली कॅपिटल्समध्ये परत आल्यामुळे या वर्षीच्या हंगामासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या मागील कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्सने संघ म्हणून चांगली कामगिरी केली. मी यावेळी आधीच खेळाडूंमध्ये सामील झालो आहे आणि मी त्यांना एक संघ म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. आशा आहे की पुढील काही महिन्यात आपल्या सर्वांचा वेळ चांगला जाईल.’
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times