चेन्नई: वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धेसाठीचा भारतीय संघ अंतिम टप्प्यात आला आहे. आम्ही या स्पर्धेत खेळणारे १७-१८ खेळाडू निश्चित केले आहेत. आता याच खेळाडूंना वर्ल्ड कपपूर्वी अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न असेल, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक तिसऱ्या वनडेपूर्वी द्रविड यांनी ही टिप्पणी केली.

भारतीय संघ २०१९च्या वर्ल्ड कपनंतर ५३ वनडे खेळला आहे. खेळाडूंच्या दुखापती, त्यांना सलग सामन्यांचा ताण येऊ नये यासाठी द्यावी लागलेली विश्रांती यामुळे अनेकदा संघात बदल करणे भाग पडले. मात्र आता वर्ल्ड कप सहा महिन्यांवर असताना अंतिम संघात असलेल्या खेळाडूंना अधिकाधिक संधी देणार असल्याचे द्रविड यांनी स्पष्ट केले.

अंतिम केलेल्या खेळाडूंपैकी काही जण अद्याप जायबंदी आहेत. ते पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर संघात येतील. वर्ल्ड कप संघासाठी निश्चित केलेल्या खेळाडूंतून विविध पर्यायांचा विचार करून संघाची निवड होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ प्राथमिक साखळीच्या लढती नऊ शहरात खेळणार आहे. त्या प्रत्येक सामन्याच्यावेळी वातावरण भिन्न असेल. त्यामुळे संघात चार वेगवान गोलंदाज असणार का, तीन फिरकी गोलंदाजांची एकाच लढतीसाठी निवड होणार का यासारख्या पर्यायांचा विचार करून संघाची निवड होणार आहे. वर्ल्ड कपचा विचार करून हे करणार आहोत, ज्याद्वारे वर्ल्ड कपपूर्वी सर्व परिस्थितीस सामोरे जाण्याची आमची तयारी असेल, असे द्रविड म्हणाले.

IND vs AUS: निर्णायक वनडेत कसे असेल पिच, हवामान आणि प्लेइंग ११; ‘एक्स फॅक्टर’ मात्र एकच…
भारतीय संघ २०२३-२०२७ या कालावधीत केवळ ४२ वनडे खेळणार आहेत. आयपीएल आणि कसोटी जगज्जेतेपदामुळे या लढती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना पुरेशी विश्रांतीही मिळणार नाही. ‘आम्हाला कार्यक्रमाची पूर्ण जाणीव आहे. कार्यक्रम भरगच्च आहे. त्यात कोणताही सामना अतिरिक्त खेळण्यास वाव नाही. आयपीएलनंतर भारतात पावसास सुरुवात होईल. त्यामुळे आपला ऑफ सीझन असतो. हे प्रश्न असले तरी संघ काय असणार याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे’, असेही द्रविड यांनी सांगितले.

अपयश येणारच

मुंबईतील खेळपट्टीने सर्वच फलंदाजांचा कस पाहिला. विशाखापट्टणमला आम्ही फलंदाजीत अपयशी ठरलो. गेल्या वर्षभरात आम्ही वनडेमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. एखाद्या सामन्यात डाव कोलमडू शकतो. मिचेल स्टार्कनेही प्रभावी मारा केला होता. स्टार्कच्या गोलंदाजीस यशस्वीपणे कसे सामोरे जाता येईल, यासाठी नक्कीच मार्ग शोधणे भाग आहे, असे द्रविड म्हणाले.

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होणार मोठा बदल; चेपॉकसाठी रोहित शर्माचा गेम प्लॉन तयार
प्रशिक्षक म्हणतात…

– मायदेशातील नऊ सामन्यातून नेमके काय साध्य झाले आहे, हे आम्ही जाणतो

– आजच्या सामन्याच्या निकालाचा वर्ल्ड कप पूर्वतयारीवर फारसा परिणाम नाही

– श्रेयसची अनुपस्थिती दुर्दैवी. वर्ल्ड कपमध्ये तो चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता

– सुर्या दोन चांगल्या चेंडूंवर बाद. तो वनडेचे तंत्र शिकत आहे

– दहा वर्षे आयपीएल खेळत असल्याचा त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात फायदा

– मनगटाच्या मदतीने चेंडू वळवणारा गोलंदाज नक्कीच वर्ल्ड कपच्या कालावधीत जास्त उपयुक्त

– कुलदीप हे नक्कीच करू शकतो. डावाच्या मध्यास तो सातत्याने विकेट घेत आहे

– कुलदीपला पसंती असल्यामुळे युजवेंद्र चहलला दुर्दैवाने संधी देता येणार नाही

– ऑक्टोबरमधील खेळपट्ट्या आयपीएलइतक्या फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या नसतील

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here