अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात मराठमोळा गडी ऋतुराज गायकवाडानं धमाका केला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडनं ९२ धावांची घणाघाती खेळी साकारली. ऋतुराजच्या वादळी खेळीमुळे चेन्नईनं १७८ धावा उभारल्या. या खेळीत त्यानं ९ षटकार ठोकले. ऋतुराजनं त्याच्या ९२ धावांच्या खेळीनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं. ऋतुराज आतापर्यंत ३७ सामने खेळला आहे. त्याच्या खात्यात १२९९ धावा जमा आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर ३७ आयपीएल सामन्यांमध्ये १२७१ धावा जमा होत्या. कालच्या दमदार खेळीनं ऋतुराजनं सर्वच भारतीय क्रिकेटपटूंना मागे टाकलं.
शिवम दुबे, वाट लावलीस चेन्नईची; CSK चे चाहते भडकले, अपयशाचं खापर फोडलं
आयपीएलच्या पहिल्या ३७ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शॉन मार्शच्या नावावर आहे. मार्शनं ३७ सामन्यांमध्ये १५२३ धावा केल्या आहेत. त्यानंतर ख्रिस गेलचा नंबर लागतो. त्याच्या नावावर १५०४ धावा आहेत. गेलनंतर मायकल हसीचा क्रमांक आहे. ३७ सामन्यांनंतर त्याच्या खात्यात १४०८ धावा जमा होत्या. हसीनंतर चौथ्या नंबरला ऋतुराज आहे. त्याच्यापेक्षा अधिक धावा कोणत्याही भारतीय खेळाडूला काढता आलेल्या नाहीत.

ऋतुराजनं ५० चेंडूंमध्ये ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्यानं ४ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी केली. ऋतुराज वगळता बाकीच्या फलंदाजांनी ७१ चेंडूंत ७८ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. एकट्या ऋतुराजनं मारलेल्या षटकारांची बरोबरी संपूर्ण संघालादेखील करता आली नाही. गायकवाडला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही.

मैदानात तुफानी खेळी अन् मैदानाबाहेर संयम… धोनीच्या शिष्यानं कधीच घडलं नाही ते करुन दाखवलं

गायकवाडच्या ९२ धावांच्या खेळीमुळे चेन्नईनं १७८ धावा उभारल्या. पहिल्या ११ षटकांमध्ये १०० धावा करणाऱ्या चेन्नईला त्यानंतर गुजरातनं ब्रेक लावला. चेन्नईच्या संघातील इतर कोणत्याच खेळाडूला ऋतुराजसारखी फलंदाजी करता आली नाही. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलनं आक्रमक अर्धशतक करत संघाला सुसाट सुरुवात करून दिली. त्यानं ३६ चेंडूंमध्ये ६३ धावा चोपल्या. त्याच्या खेळीमुळे गुजरातच्या संघानं चेन्नईनं दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here