नवी दिल्ली : जंतर – मंतर येथील आंदोलनस्थळी बुधवारी रात्री एकच गोंधळ झाला. आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस कर्मचारी आमनेसामने आले. काही मिनिटांतच वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या मारहाणीत कुणाच्या डोक्याला, कोणाच्या पायाला दुखापत झाली. विनेश फोगट, बजरंग पुनिया या दिग्गज कुस्तीपटूंना दुखापत झाली आहे. कुस्तीपटूंना आंदोलनास्थळी अतिरिक्त गाद्या आणि फोल्डिंग बेड आणायचे होते. मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं, पण त्यावेळी पोलिसांनी त्यांना बेड आणू दिले नाही.
एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने विनेश फोगट, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांना मारहाण केली असल्याचीही माहिती आहे. तसंच शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावर पुरुष कुस्तीपटूंनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद वाढला आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं.

तर आमच्या मेडलचं काय करणार?

जर आमच्या मेडलचा सन्मान असा होत नसेल तर आम्ही या मेडलचं काय करणार. त्यापेक्षा आम्ही आमचं आयुष्य साधेपणाने जगू आणि आम्ही जिंकलेली सर्व मेडल भारत सरकारला परत करू. धक्का-बुक्की आणि शिवीगाळ करताना पोलिसांना आम्ही पद्मश्री आहोत हे दिसत नाही का? पोलिसांनी आमच्या या सन्मानाची लाज ठेवली नसल्याचं म्हणत बजरंग पुनिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

बृजभूषणविरोधात करावाई पण तरीही कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच का राहणार, जाणून घ्या एकच कारण
या प्रकारानंतर कुस्तीपटूंनी प्रेस कॉन्फ्रेरन्समध्ये काय म्हटलं?

जंतर – मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी बुधवारी रात्री घडलेल्या सर्व प्रकाराबाबत आपली बाजू मांडली. विनेश फोगटने सांगितलं, की त्यावेळी कोणीही महिला कॉन्स्टेबल घटनास्थळी नव्हती. सर्वच पोलीस नशेत होते. तर बजरंग पुनिया यांनी आमची लढाई सरकारशी नाही, तर केवळ बृजभूषणशी असल्याचं म्हटलं.

बुधवारी रात्री नेमकं काय घडलं?

बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे जंतर-मंतरवर पाणी साचलं होतं. त्यामुळे कुस्तीपटूंकडे असलेल्या गाद्या पावसाच्या पाण्याने भिजल्या होत्या. त्यामुळे कुस्तीपटूंना अतिरिक्त गाद्या आणि फोल्डिंग बेड आणायचे होते. पण दिल्ली पोलिसांनी त्यांना यासाठी परवानगी दिली नाही. तसंच एका नशेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि संगीता फोगाट यांच्यासोबत गैरवर्तवणूक केली. तसंच या महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


या प्रकारादरम्यान बजरंग पूनिया आणि साक्षीचे पती सत्यव्रतने हस्तक्षेप केला. हे प्रकरण वाढत गेलं आणि कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये मारहाण झाली. पोलिसांनी यानंतर धक्का-बुक्की करत लाठीमार केल्याचाही आरोप आहे.

बजरंग पुनिया यांच्या खाद्याला दुखापत झाली, तर विनेशच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. गीता आणि बबिता फोगाट यांच्या भाऊ दुष्यंत फोगाटच्या डोक्याला मारहाण झाली. त्यांना RML रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here