यंदा आयपीएल हे युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी किती खेळाडू युएईमध्ये न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण युएईमध्ये जर फलंदाजांना सराव करायचा असेल तर त्यांना जास्त आणि विविधता असलेले गोलंदाज लागतील. त्यासाठीच विदर्भाचा वेगवान गोलंदाज असलेल्या आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य आता आरसीबीच्या संघाकडून युएईला जाणार आहे.
आरसीबीने खेळाडूंना चांगला सराव मिळावा, यासाठी एका डेव्हलपमेंट चमूची निवड करण्यात आली आहे. या चमूतील खेळाडू आरसीबीच्या संघातील मुख्य खेळाडूंना सराव देण्याचे काम करतील. गेल्या काही वर्षांपासून आदित्य हा सातत्याने दमदार गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची निवड आरसीबीच्या या चमूमध्ये करण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे. २०१८ साली झालेल्या युवा विश्वचषकातही आदित्यने चांगली कामगिरी केली होती. या विश्वचषकानंतर आदित्य प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आदित्यने भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याची निवड यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये करण्यात आली आहे.
आरसीबीच्या संघात क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माईक हेसन हे आहेत, त्यांच्याकडेच खेळाडूंच्या नियुक्तीचे काम देण्यात आले आहे. हेसन यांना आदित्यची गोलंदाजी आवडली. त्याचबरोबर गेले काही वर्षे आदित्य हा सातत्याने चांगली गोलंदाजी करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे आरसीबीच्या फलंदाजांना चांगला सराव मिळाला म्हणून आदित्यची निवड त्यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे.
आदित्यला फक्त फलंदाजांना सराव देण्यासाठी आरसीबी संघाबरोबर युएईला नेणार आहेत. पण नेट्समध्ये सराव करत असताना जर त्याची गोलंदाजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षकांना आवडली तर त्याला संघातून आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आदित्य सरावात नेमकी कशी गोलंदाजी करतो, यावर त्याचा आयपीएलमधील पदार्पण अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times