सध्याच्या घडीला आयपीएलची जोरदार तयारी सुरु आहे. खेळाडूंच्या करोनाच्या चाचण्याही सुरु आहेत. यामध्येच आयपीएलपूर्वीच भारताचा एक क्रिकेटपटू करोना पॉझिटीव्ह आढळला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. यापुढे या खेळाडूला तीन करोनाच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत.

करोनामुळे भारताचे क्रिकेटपटू आपल्या घरातच आहेत. जास्त लोकांच्या संपर्कात येण्याचे ते टाळत होते. त्यामुळेच भारताच्या खेळाडूंनी सरावही केला नव्हता. पण तरीही भारताचा एक क्रिकेटपटू करोना पॉझिटीव्ह आढळल्याचे आता समोर आले आहे.

आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब या संघातील हा खेळाडू आहे. या खेळाडूने भारताचेही प्रतिनिधीत्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तर या क्रिकेटपटूने दमदार कामगिरी केली होती. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्याला करोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहेत. त्यामुळे आता या खेळाडूच्या आणखी काही चाचण्या होणार आहेत.

हा खेळाडू आहे तरी कोण…आयपीएलमध्ये हा खेळाडू किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो. त्याचबरोबर भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने त्रिशतक झळकावण्याचा पराक्रमही केला आहे. भारताचा हा खेळाडू आहे करुण नायर. करुणला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी करुणला करोना झाला होता. पण आता त्याची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले जात आहे. आठ ऑगस्टला करुणची करोना चाचणी करण्यात आली होती. करुणची ही चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यामुळे आता आयपीएल खेळण्यासाठी करुण उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. पण आयपीएल खेळण्यासाठी करुणला आता तीन करोनाच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. या तिन्ही चाचण्यांमध्ये करुण निगेटीव्ह आढळला तरच त्याला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. पण आतापर्यंत युएईमध्ये एकही आयपीएलमधील संघ पोहोचू शकलेला नाही. सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणार असून त्यानंतर त्यांना युएईला पाठवण्यात येणार आहे. यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये रंगणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने दुबई, आबुधाबी आणि शारजा या तीन ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here