इम्रान जेव्हा खेळत होते तेव्हा जावेद हे संघाचे कर्णधार होते. पण १९९२ साली इम्रान हे पाकिस्तानचे कर्णधार होते, जेव्हा त्यांनी विश्वचषक जिंकला होता. जावेद मियाँदाद यांनी पाकिस्तानकडून १२४ कसोटी सामने आणि २३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. १९९२ च्या विश्वचषक विजयी संघात त्यांचा सहभाग होता. मियाँदाद यांच्या मुलाचा विवाह कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुलीसोबत झाला आहे.
इम्रान आणि जावेद हे सख्खे मित्र असल्याचे म्हटले जात होते. पण आता या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जाते. इम्रान यांनी देशाची घोर निराशा केली, असे म्हणत जावेद यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. त्याचबरोबर आता इम्रान यांच्याविरोधात राजकारणात उतरण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता हे दोन जुने मित्र राजकारणात मात्र एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे दिसत आहे.
मियाँदाद यावेळी म्हणाले की, ” इम्रान यांनी राजकारणात येण्यापूर्वी काही गोष्टी देशासाी करण्याच्या ठरवल्या होत्या. आता त्यांच्याकडे पंतप्रधान हे सर्वात मोठे पद आहे, पण तरीही त्यांच्याकडून पाकिस्तानच्या भल्याचे निर्णय होताना दिसत नाही. ज्या ध्येयाने इम्रान हे पाकिस्तानच्या राजकारणात उतरले होते, ते आता सर्व विसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या गोष्टीला कारणीभूत इम्रानच आहेत.”
ते पुढे म्हणाले की, ” पाकिस्तानच्या जनतेने इम्रान यांच्यावर विश्वास ठेवला होता. कारण इम्रान यांनी त्यांना बरीच स्वप्नं दाखवली होती. त्यानंतर इम्रान यांनी पाकिस्तानची सत्ता मिळवली. पण त्यानंतर इम्रान यांनी देशवासियांसाठी काहीच केले नाही. पाकिस्तानमधील लोकांना रोजगार मिळवून देण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर त्यांनी जी आश्वासने दिली होती, त्याचीही पूर्तता त्यांच्याकडून झाल्याचे पाहायला मिळत नाही.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times