नवी दिल्ली: गेल्या एक वर्षाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट चाहते महेंद्र सिंह धोनीची वाट पाहत होते. आयपीएलचे स्थगित झाल्यामुळे धोनीच्या चाहत्यांची काळजी वाढली होती. पण युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमुळे सर्वांना आनंद झाला. कारण त्यानंतर धोनी पुन्हा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार होता.

कालच धोनी आयपीएलच्या तयारीसाठी रांचीहून चेन्नईला दाखल झाला होता. भारतीय चाहते धोनीची वाट पाहत असताना त्याने अचानक सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली.

याआधी धोनीने कसोटी क्रिकेटमधून २०१४ साली निवृत्ती घेतली होती. त्यानंतर धोनी विराटच्या नेतृत्वाखाली संघात एक सिनिअर खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडली होती. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीला संघाला विजय मिळून देता आला नाही. त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. गेल्या वर्ष भरात अनेक वेळा धोनीच्या निवृत्तीची बातमी आली पण धोनी कडून त्यावर कधीच भाष्य केले नाही.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने २००४मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. त्यानंतर धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर बनला. धोनीने २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीमचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तो कसोटी आणि वनडेचा देखील कर्णधार झाला. धोनीने अनेक वर्षे भारताच्या मधल्या फळीला आधार दिला. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १७ हजार धावा आहेत. टी-२०, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला कर्णधार आहे.

धोनीने भारतीय संघाकडून ३५० वनडे सामन्यात १० हजार ७७३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५०.६ इतकी आहे. यात १० शतक आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९० कसोटीत ३८.१च्या सरासरीने धोनीने ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. टी-२०त धोनीने भारताकडून ९८ सामने खेळले असून यात त्याने ३७.६च्या सरासरीने १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here