धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना १० जुलै २०१९ या दिवशी इंग्लंडमधील क्रिकेट विशवचषकात खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात धोनीने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. धोनी भारताला हा सामना जिंकवून देईल, असे वाटत होते. पण धोनी चारटी धाव घ्यायला गेला आणि रनआऊट झाला होता. पण धोनी आपल्या अखेरच्याच सामन्यात रन आऊट झाला नव्हता, तर कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही धोनी रन आऊट झाला होता.
धोनीने आपला पहिला सामना २३ डिसेंबर २००४ या दिवशी खेळला होता. पण या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला होता. याचाच अर्थ असा की, धोनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यातही रन आऊटच झाल्याचे पाहायला मिळाले.
धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. कारण धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले होते. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा होता. धोनी सध्या आयपीएलचा विचार करत असेेल, असेच चाहत्यांना वाटत होते. पण आज अखेर निवृत्तीचा निर्णय घेत धोनीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
धोनीने एक इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केल्यावर पहिल्यांदा त्याच्या निवृत्तीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही, याबाबत उलगडा होत नव्हता. पण काही वेळाने अखेर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबतचा उलगडा झाला. धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. आज धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही रामराम ठोकला. त्यामुळे धोनी आता भारताच्या जर्सीमध्ये चाहत्यांना दिसणार नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times