IPL Final 2023 : अहमदाबादमध्ये आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाच्या ख्वाडामुळे आयपीएलचा महाअंतिम सामनाही होऊ शकला नाही. संततधार पावसामुळे आज एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. नाणेफेकही झाली नाही. आता सोमवारी सामना होणार आहे. पण सोमवारी पावसाने हजेरी लावली तर… अहमदाबादमध्ये सोमवारी हवामान कसे आहे.. काय सांगतो हवामानाचा अंदाज… 

सोमवारी अहमदाबादचे हवामान कसे आहे ?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. accuweather संकेतस्थळानुसार, अहमदाबादमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. संकेतस्थळानुसार, संध्याकाळी सात ते दहा वाजता पावसाची शक्यता आठ टक्के वर्तवण्यात आली आहे. तर रात्री 11 वाजता पावसाची शक्यता 20 टक्के इतकी आहे. त्यामुळे सोमवारीही फायनलवर पावसाचे सावट आहे. हवामान ढगाळ असून पावसाची अंधूक शक्यता नाकारता येत नाही. पाहा सोमवारी कसे असेल वातावरण…. 

(सौजन्य : accuweather )

उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात धो धो –
29 मे रोजी उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  बनासकांठा, पाटन, मेहसाणा आणि साबरकांठा येथे वादळी पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय राजकोट, अमरेली, भावनगर आणि कच्छ येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

अहमदाबादमध्ये कसे असेल सोमवारी हवमान

(सौजन्य – hi.meteocast.net)

सोमवारीही पाऊस थांबला नाही तर विजेता कोण ?
आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?  धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. पण अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे आज सामना झाला नाही. जवळपास चार ते पाच तास इथं जोरदार पाऊस पडला. पंचांनी रात्री 11 वाजेपर्यंत सामना सुरु होण्याची वाट पाहिली.. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झालाय. आता राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारी आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. 

यंदाच्या मोसमात हार्दिक आणि धोनीच्या दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकणार होत्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा IPL सामना ठरण्याची शक्यता आहे.. त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी IPL च्या फायनलमध्ये धडक मारलीय. IPL च्या मागच्या मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं. यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहील. पण चारवेळा IPL जिंकणाऱ्या चेन्नईचं यंदा गुजरातसमोर तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर IPL च्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत…एकीकडे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला लागलीय.. मात्र दुसरीकडे सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here