महेंद्रसिंग धोनी हा एक कॅप्टन कूल म्हणून ओळखला जायचा. कारण परिस्थिती कशीही असली तरी तो कधी डगमगला नाही. विजयानंतर जल्लोष नाही आणि पराभवानंतर निराश नाही. पण निवृत्ती घेतल्यानंतर मात्र धोनी चांगलाच भावुक झाला होता, असे म्हटले जात आहे. निवृत्ती जाहीर केल्यावर धोनीचा बांध फुटला होता आणि त्याने सुरेश रैनाबरोबर एक खास गोष्टही त्यावेळी केल्याचे आता समजते आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आज सर्वांना धक्का देत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली. धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे जेव्हा धोनीने निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्या क्रिकेटमधील अविस्मरणीय गोष्टी नक्की तरळल्या असतील. त्यामुळेच निवृत्तीनंतर धोनीचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएलची तयारी करण्यासाठी धोनी चेन्नईला पोहोचला होता. पण त्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल, असे कोणालाही वाटत नव्हते. अपवाद होता तो फक्त सुरैश रैनाचा. कारण रैनाला याबाबत कुणकुण लागली होती, असे त्याचे म्हणणे आहे. रैना म्हणाला की, ” जेव्हा आम्ही चेन्नईसाठी रवाना झालो तेव्हा धोनीही आमच्याबरोबर होता. त्यावेळी धोनी निवृत्तीचा विचार करत असल्याचे मला समजत होते. पण धोनी नेमका कधी निवृत्ती जाहीर करेल, हे मात्र मला माहिती नव्हते.”

निवृत्तीनंतर धोनीने काय केले, याबाबत रैना म्हणाला की, ” निवृत्ती घेतल्यानंतर धोनी माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारली. त्यानंतर आम्ही दोघं खूप रडलो, कारण एवढ्या वर्षांच्या आठवणीही आमच्याबरोबर होत्या. पण या गोष्टीचे जास्त वाईट वाटून घ्यायचे नाही, असे आम्ही ठरवले होते. त्यामुळे त्या रात्री आम्ही पार्टीही केली. आता कोणतेही दडपण आमच्यावर नसेल, त्यामुळे आयपीएलमध्ये आम्ही आता बिनधास्त खेळू शकतो.”

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here