पुणे : कोणत्याही खेळात चॅम्पियन खेळाडू आणि इतर खेळाडूंमध्ये फरक काय असतो?… चॅम्पियनकडे कोणत्याही परिस्थितीशी, माणसांशी आणि मुळात खेळाच्या बदलणाऱ्या स्वरूपाशी अतिशय चटकन जुळवून घेण्याची क्षमता असते. महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेटमधला असाच एक चॅम्पियन होता… आहे!

धोनीने भारतीय क्रिकेटला खूप काही दिले; पण या सगळ्यातही त्याचे सर्वांत मोठे योगदान काय असेल, तर ते हे, की त्याने छोट्या शहरांतील क्रिकेटपटूंना मोठी स्वप्ने पूर्ण होतात, हा विश्वास दिला. जागतिकीकरणानंतर भारतातील मध्यमवर्गात फुललेल्या आकांक्षांचे प्रतीक वेगवेगळ्या क्षेत्रांत उमटत होतेच. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये ते अधिक ठळकपणे उमटवले, सौरभ गांगुलीने ते आक्रमकतेकडे नेले आणि महेंद्रसिंह धोनीने त्याला संयतपणाची जोड देऊन भारतीय क्रिकेट संघाला जिंकण्याचीही सवय लागू शकते, हा विश्वास दिला. धोनी कसा ‘फिनिशर’ आहे, याची क्रिकेटच्या भाषेत समीक्षा होऊच शकते; पण त्याच्यातल्या ‘फिनिशर’ने एरवी तेंडुलकर बाद झाल्यावर टीव्ही बंद करणाऱ्या किंवा चॅनेल बदलणाऱ्या प्रेक्षकांना रिमोट हातात असूनही अक्षरश: शेवटपर्यंत सामने पाहायला लावले, हे आपण विसरायला नको!

धोनी हा काही रुढार्थाने शैलीदार फलंदाज नाही. मात्र, त्याच्याकडे चिवटपणे आणि तरीही बेधडक फलंदाजी करून एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता होती. ‘हेलिकॉप्टर शॉट’ हे ‘आइसिंग ऑन द केक’! मुळात एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून सर्व परिस्थितींमध्ये शांतपणे टिकून राहण्याची धोनीची वृत्ती त्याला यशाकडे नेणारा रस्ता अधिक सुकर करून गेली असावी. धोनी क्रिकेटच्या कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये यशस्वी झाला, तो याच क्षमतेवर. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो एकटाच यश मिळवत गेला, असे झाले नाही, तर त्याने इतरांना फुलवण्याची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर वाहिली. उदाहरणादाखल सांगायचे, तर अलीकडच्या काळातील फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या गुणवत्तेला विकेट घेण्याची धार लावली ती धोनीने. यष्टीरक्षक म्हणून त्याच्या नजरेने टिपलेले प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांच्या शैलीतले कच्चे दुवे किंवा खेळपट्टीतले बारकावे त्याने या गोलंदाजांना अचूक पुरवले. किंबहुना अनेक गोलंदाजांना विकेट मिळवून देणाऱ्या क्षेत्ररक्षणाच्या नव्या जागा या चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या नजरेनेच शोधल्या. आपल्या संघावर पूर्ण विश्वास टाकणारा हा कर्णधार होता.

सामन्यातल्या अवघड क्षणी केवळ तो क्षण जगण्याची आणि त्या क्षणी आपल्या सहकाऱ्याला सांगितलेल्या अगदी अवघड गोष्टीसाठीही त्याची पाठराखण करण्याचा त्याचा धीरोदात्तपणा लाजबाबच. आणि आणीबाणीच्या प्रसंगी सगळी सूत्रे आपल्याकडे घेऊन (आठवा २०११ च्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना) सामना खेचणे हे तर धोनीकडूनच शिकावे! हे सगळे करून सामना जिंकल्यानंतर जणू मी काही फार महान वगैरे केलेले नाही, अशा पद्धतीने त्याचे घडून गेलेल्या क्षणापासून शांतपणे बाजूला होऊन नव्या क्षणात जाणे हे अचंबित करणारेच आहे. कर्णधारपद सोडल्यानंतरही त्याने याच शांतपणे ही धुरा विराट कोहलीकडे सोपवली. आता निवृत्ती घेतानाही त्याने कोणतेही भाषण करणे टाळून अक्षरश: दोन ओळींत हा निर्णय कळवला! असे म्हणतात, की धोनीने खेचलेल्या षटकारानंतर चेंडू आकाशातून एखाद्या धूमकेतूसारखा प्रवास करताना भासतो. क्रिकेटच्या क्षितिजावरच्या या धूमकेतूने हे क्षितिज उजळवले आणि आणखी मोठेही केले!

Siddharth.kelkar@timesgroup.com

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here