धोनीने निवृत्ती घेतल्यामुळे आता तो भारताकडून दिसणार नाही, असे म्हटले जात होते. पण धोनीचे करोडो चाहते आहेत आणि त्यांना धोनीला भारताकडून खेळताना पुन्हा पाहायचे आहे. त्यामुळे आता धोनीने भारताकडून खेळून निवृत्ती घ्यावी, याचे दडपण आता वाढायचा लागले आहे. त्यामुळे बीसीसीआय धोनीसाठी एक खास प्लॅन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला विनंती केली तर तो भारताकडून ट्वेन्टी-२० विश्वचषकही खेळू शकतो, असे म्हटले जात आहे.
धोनीला भारताकडून कसे खेळवता येईल, याचा प्लॅन आता बीसीसीआय करत असल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ” सध्याच्या घडीला तर करोनामुळे भारताची क्रिकेट स्पर्धा होऊ शकत नाही. पण आम्ही धोनीसाठी निरोपाचा सामना किंवा एखादी मालिका खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही दिवसांनी आता आयपीएल होणार आहे. आयपीएलमध्ये आम्ही धोनीबरोबर या गोष्टीची चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर बीसीसीआय त्याच्या निवृत्तीच्या सामन्याची प्लॅनिंग करणार आहे.”
धोनीने जर निरोपाचा सामना खेळायचा नाही, असे जर ठरवले असेल तर बीसीसीआयपुढे पेच निर्माण होऊ शकतो. पण बीसीसीआयकडे याबाबत दुसरा अजून एक प्लॅन असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ” आपला निरोपाचा सामना खेळायचा की नाही, याबाबत धोनीचा निर्णय अंतिम असेल. कारण त्याला जर निरोपाचा सामना खेळायचा नसेल तर बीसीसीआयच्या त्यावर दडपण आणणार नाही. पण त्यानंतर धोनीसाठी एक खास सोहळ्याचे आयोजन बीसीसीआय करू शकते, यामध्ये धोनीचा निर्णय घेण्यात येणार नाही. कारण हा सर्वस्वी निर्णय बीसीसीआयचा असेल. त्यामुळे धोनी जर निरोपाचा सामना खेळला नाही तर त्याच्यासाठी आम्ही एक सोहळा नक्कीच आयोजित करणार आहोत.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times