ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ मैदानावर आले. फायनलचा आजचा पहिला दिवस आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधलेली आहे. फक्त भारतीय संघानेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या संघातील सर्व खेळाडूंनीही काळीपट्टी बांधलेली आहे. ही काळीपट्टी ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त करणारी आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ओव्हल मैदानात एक मिनिट उभं राहून मौन पाळत ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना दोन्ही संघांनी आणि मैदानासह स्टेडियममध्ये उपस्थितीत असलेल्या क्रिकेटप्रेमींनी आदरांजली वाहिली. यावेळी संपूर्ण मैदान स्तब्ध झाल्याने हा भारतीयांसाठी अतिशय भावुक क्षण ठरला. ओडिशातील घटनेने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेबद्दल संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत आहे. अशावेळी भारतीय आणि ऑस्ट्रेलियाच्या संघासह ओव्हल मैदानावर, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि संपूर्ण जगाला एकतेचा अन् मानवतेचा संदेश दिला.
बीसीसीआयनेही केलं ट्विट
बीसीसीआयनेही ट्विट करत माहिती दिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहिली. भारतीय संघाने मृतांना आदरांजली वाहत त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांबद्दल मनापासून शोक व्यक्त केला. तसंच एकतेचा संदेश देत भारतीय संघाने हाताला काळी पट्टी बांधल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. बीसीसीआयने ही माहिती देताना भारतीय संघाचा फोटोही ट्विट केला आहे.
ओडिशातील रेल्वे अपघाताची CBI चौकशी
ओडिशाच्या बालासोरमध्ये गेल्या आठवड्यात भीषण अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेससह तीन रेल्वे गाड्यांमध्ये हा अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील मृतांपैकी २०५ मृतदेहांची ओळख पटवून ती नातेवाईकांना सोपवण्यात आली आहेत. पण हा अपघात इतका भीषण होता की अजूनही ८३ मृतांची ओळख पटू शकलेली नाही. ओडिशा सरकारकडून हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. रेल्वे अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांनी 18003450061 or 1929 या क्रमांकावर फोन करावा आणि मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन ओडिशा सरकारकडून करण्यात आलं आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More