गेल्या काही महिन्यांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीची शक्यता व्यक्त केली आहे. ‘धोनीसोबत माझं बोलणं झालं आहे आणि ते आमच्या दोघांमध्येच आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. लवकरच तो एकदिवसीय क्रिकेटमधूनही संन्यास घेऊ शकतो,’ असं शास्त्री म्हणाले. धोनी क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये सातत्यानं खेळला आहे आणि त्याचा सन्मान व्हायलाच हवा, असंही ते म्हणाले.
‘त्याला कदाचित आता टी-२० क्रिकेटच खेळायचं असेल. आता तो आयपीएल खेळणार आहे आणि त्यानंतर पुढे तो कोणता निर्णय घेतो हे पाहावं लागेल,’ असं शास्त्री म्हणाले. धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकला तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या प्रकारात त्याच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. धोनी कर्णधार असताना भारतानं आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचं जेतेपद पटकावलं आहे. धोनी जुलै २०१९पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. धोनीनं भारताकडून अखेरचा सामना न्यूझीलंडविरोधात खेळला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी संघ निवड करताना कामगिरी आणि अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
‘आपल्याला खेळाडूचा अनुभव आणि कामगिरीचा विचार करावा लागेल. त्याला पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. जर धोनी आयपीएलमध्ये चांगला खेळला तर, तो स्वतः दावेदार होऊ शकतो,’ असंही शास्त्री म्हणाले. दरम्यान, धोनी भारताकडून ३५० एकदिवसीय सामने, ९० कसोटी आणि ९८ टी-२० सामने खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं २००७ साली टी-२० वर्ल्डकप आणि २०११ साली एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News