भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. पण धोनीला बीसीसीआयने एक धक्का दिला होता आणि त्यानंतर धोनीने निवृत्तीचा विचार करायला सुरुवात केली, असे म्हटले जात आहे.

धोनीने तडकाफडकी आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला, असे काही जणांना वाटते. पण ही गोष्ट तशी नक्कीच नाही. बीसीसीआयने धोनीला या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्का दिला होता. या धक्क्यातून धोनी सावरू शकला नव्हता. त्यामुळेच धोनीने अखेर १५ ऑगस्टला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

धोनी गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर धोनीला आतापर्यंत मैदानात खेळण्यासाठी उतरल्याचे पाहिले गेले नाही. बीसीसीआयने जानेवारी महिन्यातच धोनीला एक धक्का दिला होता. बीसीसीआयने १६ जानेवारीला या वर्षातील पुरुष क्रिकेटपटूंच्या करारांची घोषणा केली. या करारामध्ये धोनीचे नाव वगळण्यात आले होते. त्यावेळीच बीसीसीआयने धोनीला निवृत्ती घेण्याचा इशारा दिला होता, असे म्हटले जाते.

बीसीसीआयने करारामध्ये स्थान न दिल्यामुळे धोनी निराश झाला होता. या धक्क्यातून तो सावरू शकला नाही. त्यावेळी रांची येथील आपल्या जवळच्या मित्रांना धोनीने काही प्रश्न विचारले होते. धोनी आपल्या मित्रांना म्हणाला होता की, ” मी क्रिकेट खेळण्यासाठी फिट नाही का, मला बीसीसीआयने आपल्या करारामध्ये स्थान का दिले नाही?” पण त्याचवेळी बीसीसीआयने असे नेमके का केले, याची जाणीव झाली होती. त्यानंतरच धोनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला लागला होता. पण तरीदेखील आपल्याला भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा धोनीला होती. त्यामुळेच धोनी फिट राहण्यासाठी काही खास गोष्टी करत होता.

यानंतर धोनी आपल्या जवळच्या लोकांबरोबर निवृत्तीबाबत चर्चा करत होता. आपण दोन वर्षांपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती, असेही धोनी त्याच्या जवळच्या मित्रांना सांगत होता. पण बीसीसीआयने करारातून वगळल्याबद्दल धोनीला वाईट वाटले होते. या गोष्टीमुळेच धोनी निराश झाला आणि त्याने अखेर आपली निवृत्ती जाहीर करून टाकली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here