भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली होती. पण टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज फार काळ टिकले नाहीत. भारताच्या राजवर्धन हंगर्गेकरने आघाडीच्या दोघा फलंदाजांना शून्यावर माघारी पाठवले आणि पाकिस्तानची हवाच काढू घेतली. त्यानंतर भारताने एका पाठोपाठ एक नियमीत अंतराने विकेट मिळवल्या आणि पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
भारताकडून राजवर्धनने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. मानव सुथार ३ विकेट तर रियान पराग आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानला ५० षटके पूर्ण खेळता आली नाहीत. त्यांचा डाव ४८ षटकात २०५ धावांवर संपुष्ठात आला.
विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात शानदार अशी झाली. सलामीवीर साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावा केल्या. शर्मा २० धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या निकिन जोसने सुदर्शनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागिदारी केली. जोस ५३ धावांवर बाद झाला.
त्यानंतर साई सुदर्शनने कर्णधार यश ध्रुवसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद भागिदारी करत संघाला सहज विजय मिळून दिला. ३७व्या षटकात विजयासाठी भारताला १२ धावांची गरज होती. साई सुदर्शनने पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यात साईने शतक देखील पूर्ण केले. त्याने ११० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०४ धावा केल्या टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. याआधी भारताने युएई आणि नेपाळचा अनुक्रमे ८ आणि ९ विकेटनी पराभव केला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More