पुणे: भारत आणि श्रीलंके दरम्यान झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर ७८ धावांनी मात केली आहे. हा सामना जिंकतानाच टीम इंडियाने २-०ने मालिकाही खिशात घातली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर २०२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र त्याचा पाठलाग करण्यात श्रीलंकेच्या फलंदाजांना अपयश आले. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे श्रीलंकन फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही. श्रीलंकेचे फलंदाज १५.५ षटकात केवळ १२३ धावाच बनवू शकले. त्यामुळे टीम इंडियाला लंकेवर ७८ धावांनी विजय मिळवता आला.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आज पुण्यात गोलंदाजीचा जलवा दाखवला. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दानुष्का गुणाथलिकाला अवघ्या एका धावेवर बाद केलं. वॉशिंग्टन सुंदरने त्याचा झेल पकडला. शार्दुल ठाकूरने अविष्का फर्नांडोचा झेल श्रेयसच्या हाती देऊन त्याला बाद केलं. अविष्का केवळ ९ धावांवर बाद झाला. ओशादा फर्नांडोलाही अवघ्या दोन धावावर मनिष पांडेने धावबाद केलं. तर अँजेलो मॅथ्यूज ३१ धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. मॅथ्युजने धनंजयबरोबर पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली होती. तर दसून शनाका ९ धावांवर आणि हसरंगा शून्यावर बाद झाल्याने लंकेचं पानिपत झालं.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी केली. टीम इंडियाने २० षटकात ६ गड्यांच्या बदल्यात २०१ धावा केल्या. त्यात केएल राहुलने ३६ चेंडूंवर ५४ धावा कुटल्या. शिखर धवननेही ३६ चेंडूंवर ५२ धावा करून संघाला मजबूत स्थितीत नेलं. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीने १७ चेंडूत २६ आणि मनिष पांडेने १८ चेंडूत नाबाद ३१ धावा करून या जोडगळीने पाचव्या विकेटसाठी ४२ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने ८ चेंडूत २२ धावा करून टीम इंडियाचा धावफलक २००च्या पुढे नेऊन ठेवाल. पांडे आणि ठाकूरने १४ चेंडूत ३१ धावांची भागिदारी केली. श्रीलंकेकडून लक्षण संदाकनाने ३५ धावा देऊन तीन गडी बाद केले.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here