मालिकेत ३ लढती झाल्या आहेत आणि यजमान वेस्ट इंडिजने २-१ अशी आघाडी घेतली आहे. २० वर्षीय तिलक वर्माने आतापर्यंत १३९ धावा केल्या आहेत. आता विराट कोहलीच्या ऐतिहासिक रेकॉर्डकडे त्याची नजर आहे. तिलक वर्मा या मालिकेत ज्या पद्धतीने फलंदाजीकरत आहे ते पाहता विराटचा विक्रम तो सहज मोडेल असे दिसते. यासाठी त्याच्याकडे दोन मॅच आहेत.
भारतीय क्रिकेट संघाकडून कोणत्याही द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने २०२१ साली इंग्लंडविरुद्ध २३१ धावा केल्या होत्या. आता वेस्ट इंडिजविरुद्ध तिलक वर्माने ३ सामन्यात १३९ धावा केल्या असून २ सामन्यात त्याला विराटचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराटचा विक्रम मोडण्यासाठी तिलक वर्माला उर्वरीत २ सामन्यात ९३ धावा करायच्या आहे. इतक नाही तर टी-२० द्विपक्षीय मालिकेत २०० पेक्षा अधिक धावा करण्यासाठी तिलकला ६१ धावांची गरज आहे. ही कामगिरी त्याने केली तर विराट, केएल राहुल, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंच्या यादीत त्याला स्थान मिळू शकते. या सर्व खेळाडूंनी द्विपक्षीय टी-२० मालिकेत २००हून अधिक धावा केल्या आहेत.
द्विपक्षीय मालिकेत विराटनंतर सर्वाधिक धावांचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने २०१९-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यात २२४ धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानावर ईशान किशन आहे त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यात २०६ धावा केल्या होत्या.
जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याच्या नावावर आहे. त्याने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यात ३१६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २९० धावांसह मार्क चॅपमनचा क्रमांक लागतो, तर बाबर आझमने २८५ धावा केल्या होत्या.
टी-२० द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारे
विराट कोहली- २३१ धावा विरुद्ध इंग्लंड
केएल राहुल- २२४ धावा विरुद्ध न्यूझीलंड
ईशान किशन- २०६ धावा विरुद्ध द.आफ्रिका
श्रेयस अय्यर- २०४ धावा विरुद्ध श्रीलंका
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More