वेस्ट इंडीजमधील कसोटी आणि एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर रोहित शर्मा भारतात दाखल झालेला आहे. रोहित शर्माला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आलेली आहे. आशिया कप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्याचं दिसून आलं. रोहित शर्मा यापूर्वी आयपीएलच्या एका हंगामातील अंतिम फेरीतील लढतीपूर्वी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचला होता.
रोहित शर्मा आगामी काळात आशिया कप स्पर्धा आणि वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. यंदाच्या आशिया कप स्पर्धेची सुरुवात ३० ऑगस्टपासून होणार आहे. आशिया कप स्पर्धेचं संयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आलेलं आहे. पहिली लढत पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहूप्रतिक्षीत लढत २ सप्टेंबरला श्रीलंकेत होणार आहे.
रोहित शर्मा वनडे वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करणार
टीम इंडियानं २०११ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी टीम इंडियाचं नेतृत्त्व महेंद्रसिंग धोनी याच्याकडे होते. रोहित शर्मा त्या संघाचा भाग नव्हता. २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या संघात तो सहभागी होता. २०१५ आणि २०१९ मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा संघाचा भाग होता. त्या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. रोहित शर्मा यंदा प्रथमच टीम इंडियाचं वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत तरी भारताला विजेतेपद मिळून गेल्या १२ वर्षांचा दुष्काळ संपणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More