नवी दिल्ली : भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार युवराज सिंगने पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (पीसीए) विनंतीला मान देत क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. २०११मध्ये जगज्जेता ठरलेल्या भारतीय संघाच्या या अष्टपैलूने त्या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीसही पटकावले होते. गेल्यावर्षी जूनमध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली होती.

३८ वर्षांच्या युवराजने निवृत्ती मागे घेत, पंजाब क्रिकेटच्या फायद्यासाठी पुन्हा खेळावे असे पीसीएचे चिटणीस पुनीत बाली यांनी सर्वप्रथम सूचवले होते. ‘क्रिकझ’ या वेबसाइटकडे युवराज याबाबत व्यक्त झाला आहे. ‘सुरुवातीला याबाबत माझे निश्चित नव्हते. देशांतर्गत क्रिकेट मी केव्हाच थांबिवले आहे. आता बीसीसीआयची मंजुरी मिळाली असती तर मला जगातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळायचे होते. मात्र या दरम्यान मला पीसीएचे चिटणीस बाली यांच्या विनंतीकडेही दुर्लक्ष करता आले नाही. गेले तीन, चार आठवडे मी याबाबत विचार केला’,असे युवीने सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून युवराज हा पंजाब संघातील शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरनसिंग आणि अनमोलप्रितसिंग यांच्यासह नेटसरावात सक्रीय आहे. यादरम्यान आपण पुन्हा क्रिकेटच्या प्रेमात पडलो आणि नवी उमेद गवसल्याचे युवराज नमूद करतो.

युवराजने याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला कळवल्याचे बाली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे. ‘युवराज आम्हाला पंजाब संघात हवा आहे, तो ज्यापद्धतीने संघातील तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करतो आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या जीवनातील किमान एकवर्ष तरी तू पंजाब क्रिकेटला द्यावेस अशी विनंती मी युवराजला केली होती. पंजाब क्रिकेटला युवराजची आवश्यकता आहे. खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून संघासाठी योगदान देण्याजोगे युवराजकडे खूप काही आहे’, असे बाली म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वीच युवराजने गांगुलीला निवृत्ती मागे घेण्यासंदर्भात पत्र पाठवले असून त्याचे उत्तरही आले असेल, असे बाली यांना वाटते आहे.

युवराजची आई शबनमसिंग यांनीही यांनीही असेच संकेत दिले आहेत. तर युवराजचे वडील योगराज यांना तर युवीचा निवृत्तीचा निर्णय त्यावेळीही पटला नव्हता. त्याने आणखी खेळायला हवे, असे त्यांना वाटते आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here