युएईमध्ये २०१४ साली आयपीएल खेळवण्यात आले होते. यावेळी मुंबईचा संघ ५ सामने खेळलेला होता. पण या पाचही सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाला युएईमध्ये अजूनही विजयाचे खाते उघडता आलेले नाही. याबाबत रोहित शर्माने सांगितले की, ” युएईमध्ये आयपीएल खेळून बराच काळ झाला आहे. या संघातील फक्त तीन खेळाडू त्यावेळी मुंबईकडून खेळले होते. यावेळी आमचा संघ, खेळाडू आणि प्रशिक्षक हे नवीन आहेत. आम्ही जुन्या गोष्टी विसरून गेलो आहोत. त्यामुळे नव्या जोशात आम्ही यावर्षी आयपीएल खेळण्यासाठी उतरणार आहोत.”
मुंबईच्या संघात अनुभवी ख्रिस लीनचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये लीनने एक सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे लीन यावेळी सलामीला खेळणार असेल तर रोहित शर्माला मधल्याफळीत खेळावे लागेल, असे म्हटले जात होते. याबाबत रोहित म्हणाला की, ” आमचा संघ चांगलाच समतोल आहे. ख्रिस लीन हा आमच्या संघात आला आहे आणि तो एक चांगला सलामीवीर आहे. पण यावेळी मुंबई इंडियन्सची सलामी करायला मी येणार आहे आणि एवढेच मला माहिती आहे.”
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा एक मोठा धक्का आहे. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” मलिंगा या मोसमात आमच्याबरोबर नसेल. मलिंगाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. कारण मलिंगाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. बऱ्याचदा मलिंगा आमच्यासाठी मॅत विनरही ठरलेला आहे. त्यामुळे त्याची जागा भरणे आमच्यासाठी नक्कीच अवघड असेल. पण मलिंगासाठी पर्यायी गोलंदाज आम्ही खेळवणार आहोत. मलिंगाची जागा घेण्यासाठी काही पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटीन्सन, धवन कुलकर्णी आणि नॅथल कल्टर नाइल असे तीन वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे या तिघांपैकी एका गोलंदाजाला आम्ही मलिंगाच्या जागी खेळवू शकतो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times