दिल्लीच्या संघाच्या फलंदाजांना आज लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळेच त्यांना आपल्या पहिल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासमोर खेळताना १५७ धावा करता आल्या. मोहम्मद शमीने यावेळी तिखट मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना नतमस्तक होण्यास भाग पाडले. शमीची अचूक गोलंदाजी आणि त्याला मिळालेल्या योग्य साथीच्या जोरावर पंजाबने दिल्लीच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम केले. मोहम्मद शमीने आपल्या चार षटकांमध्ये फक्त १५ धावा देत दिल्लीच्या तीन फलंदजांना बाद केले. त्याचबरोबर शिखर धवनही शमीच्याच गोलंदाजीवर धावचीत झाला.

पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दिल्लीच्या संघाला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवन शून्यावर आऊट झाला. त्यानंतर शमीने पृथ्वी साव आणि शेमरॉन हेटमायर यांनाही स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला आणि दिल्लीच्या संघाला पिछाडीवर ढकलले. शमीने भेदक गोलंदाजी करत यावेळी दिल्लीची अवस्था ३ बाद १३ अशी केली होती.

दिल्लीची ३ बाद १३ अशी अवस्था असताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर फक्त एका धावेच्या अंतराने हे दोघेही बाद झाले आणि दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला. शमीने पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी करत श्रेयस अय्यरला बाद केले. श्रेयसने यावेळी ३९ आणि पंतने ३१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर मार्कस स्टॉइनिसने काही जोरदार फटके लगावले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. स्टॉइनिसने फटकेबाजी केली नसतील तर दिल्लीच्या संघाला १२० धावांचा पल्लाही गाठता आला नसता. स्टॉइनिसच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीला दिडशेपेक्षा जास्त धावा करता आल्या.

दिल्लीच्या महत्वाच्या फलंदाजांनी आज निराशा केली. दिल्लीचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर कर्णधार अय्यर आणि पंत यांच्याकडे संघाचा डाव सारवण्याची आणि मोठी धावसंख्या उभारण्याची चांगली संधी होती. पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळेच दिल्लीला पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here