चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण संजूने हा निर्णय कसा अयोग्य होता, हेच दाखवून दिले. कारण संचजूने सुरुवातीपासून चेन्नईच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. फिरकी गोलंदाजी हे चेन्नईच बलस्थान समजले जाते. पण संजूने त्यांच्या बलस्थानावरच जोरदार हल्ले चढवले. यावेळी त्याला कर्णधार स्टीव्हन स्मिथचीही चांगली साथ मिळाली. या दोघांनी मिळून फिरकीपटू पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर तब्बल सहा षटकार वसूल केले, तर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवरही चार षटकार लगावले.
संजूने चेन्नईचे गोलंदाजी खिळखिळी करून टाकली होती. कारण आपल्या धडाकेबाज खेळीत संजूने तब्बल ९ षटकारांची आतिषबाजी केली. संजूने यावेळी फक्त १९ चेंडूंमध्ये वादळी खेळी साकारत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतरही संजू बरसत राहीला. संजूने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूंत १ चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर ७४ धावांची दमदार खेळी साकारली. संजू आणि स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची झंझावाती भागीदारी रचली. त्यामुळएच राजस्थानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.
संजूला चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने बाद केले. त्यानंतर राजस्थानला डेव्हिल मिलर आणि रॉबिन उथप्पा यांच्या रुपात दोन जोरदार धक्के बसले आणि त्यांची धावगती मंदावली. पण एकाबाजूने स्मिथ हा धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. एकाबाजूने विकेट्स पडत होत्या, पण स्मिथ मात्र खेळपट्टीवर ठामपणे उभा होता. स्मिथनेही यावेळी चेन्नईच्या गोलंदाजीवर चांगला हल्ला चढवला. स्मिथने यावेळी ४७ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ६९ धावांची खेळी साकारली. स्मिथ बाद झाल्यावर मात्र राजस्थानच्या जलदगतीने धावा करण्याच्या अपेक्षा मावळल्या. चेन्नईकडून यावेळी सॅम कुरनने भेदक गोलंदाजी केली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times