दुबई : आयपीएलच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे खेळाडू अजून दुखापतीतून सावरले नसल्यामुळे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली आहे. मुंबईला सुरुवातीच्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर हैदराबादला केन विल्यम्सनची उणिव जाणवली. चेन्नईनेही दमदार फॉर्मात असलेल्या अंबाती रायुडूला आराम दिला होता. या दुखापतीमुळे संघांची चिंता कायम आहे.

ख्रिस मॉरिस
बंगळुरूचा खेळाडू ख्रिस मॉरिस पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला सुरुवातीच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं. बंगळुरूसाठी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मॉरिसचं मोठं महत्त्व आहे. तो एक किंवा दोन सामन्यांनंतर निवडीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

सनरायझर्स हैदराबादला दुहेरी चिंता
केन विल्यम्सन सध्या फिट नसल्याचं हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितलं. सराव करताना त्याला त्रास जाणवला होता. विल्यम्सनची दुखापत किरकोळ असल्याचं बोललं जातं. त्यामुळे तो लवकरच परतण्याची आशा आहे. तर दुसरीकडे बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मिचेल मार्शलाही दुखापत झाली. एक चांगला गोलंदाज आणि बेस्ट फिनिशिर म्हणून ओळख असलेल्या मिचेल मार्शबाबत संघ व्यवस्थापनाने अजून काहीही सांगितलेलं नाही.

दिल्लीला इशांत शर्मा, अश्विनची प्रतिक्षा
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना इशांत शर्माला पाठीचा त्रास जाणवू लागल्याची माहिती आहे. तो दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज आहे. पाठीचा त्रास जाणवल्यापासून त्याने अजून सरावही केलेला नाही. त्यामुळे तो कधी संघात समाविष्ट होईल याबाबत कळू शकलेलं नाही.

दिल्लीकडून पदार्पणाच्या सामन्यातच आर. अश्विनला दुखापत झाली. आपण लवकरच परतण्यास उत्सुक असल्याचे संकेत अश्विनने त्याच्या ट्वीटद्वारे दिले आहेत.

चेन्नईला ब्रॅव्होच्या दुखापतीची चिंता
वेस्ट इंडिजचा स्फोटक खेळाडू ड्वेन ब्रॅव्हो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळताना ब्रॅव्होला गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्रिनिदाद अँड टोबॅगोचं प्रतिनिधित्व करताना अंतिम सामन्यात गोलंदाजीही करता आली नव्हती. भारतात तो दुखापतग्रस्तच आला आहे. ब्रॅव्हो सुरुवातीचे दोन सामने मिस करण्याचा अंदाज वर्तवला जात होता.

मुंबईला नाथन कल्टर नाइलची प्रतिक्षा
अगोदरच लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीमुळे चिंतेत असलेल्या मुंबईलाही नाथन कल्टरची प्रतिक्षा आहे. कल्टर नुकताच सराव करताना दिसून आला होता. पण त्याच्या उपस्थितीबाबत संघ व्यवस्थापनाने अजून काहीही सांगितलेलं नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here