मुंबई : भारताला विश्वविजेता बनवणाऱ्या चेंडूचा शोध घेण्यासाठी भारतीय संघाचे माजी कर्णधार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयी षटकार लगावल्यानंतर हा चेंडू हरवला होता. चेंडू जिथे पडला त्या जागेचा शोध घेऊन धोनीच्या सन्मानार्थ त्या जागेला एक विशिष्ट ओळख देण्याचं नियोजन एमसीएने केलं आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चेंडूचा शोध घेण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती.

शोध सुरू असतानाच सुनील गावसकर यांनी एमसीएला माहिती दिली. चेंडू ज्याच्याकडे आहे तो आपला मित्रच असल्याचं गावसकरांनी एमसीएला सांगितलं. एमसीएचे अजिंक्य नाईक यांनी पत्र लिहून चेंडू पडलेल्या जागेला ओळख देण्याची कल्पना मांडली होती. धोनीने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आदर म्हणून मुंबई चेंडू पडलेली जागा कायमस्वरुपी धोनीच्या नावे ठेवणार असल्याचं नाईक यांनी म्हटलं होतं.

एल ब्लॉकमधील एमसीए पवेलियनमध्ये आसन क्रमांक २१० वर हा चेंडू पडल्याचं समोर आलं आहे. शिवाय ज्या व्यक्तीकडे हा चेंडू आहे त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे. हा बॉल असलेल्या व्यक्तीला आपण ओळखत असल्याचं आपल्या मित्राने कळवल्याचं गावसकर म्हणाले. यानंतर आता गावसकर या प्रेक्षकाशी संपर्क साधणं अपेक्षित आहे.

संपूर्ण स्टँडऐवजी एका जागेला नाव देणं ही संकल्पना भारतात नवीन असली तरी जगभरात ही संकल्पना नवी नाही. सायमन ओ डोनेल यांचा प्रथम श्रेणी सामन्यातील सर्वात लांबीचा १२२ मीटर षटकार जिथे पडला त्या जागेला पिवळ्या रंगाने राखीव ठेवण्यात आलं आहे. याचप्रमाणे २०१८ मध्ये मेलबर्नमधील एतिहाद मैदानात बिग बॅशमधील संघ मेलबर्न रेनगेडने आपला खेळाडू ब्रॅड हॉजचा सन्मान करण्यासाठी जागेला लाल रंग दिला, जिथे हॉजने लगावलेला ९६ मीटर लांबीचा षटकार पडला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here