वृत्तसंस्था, मुंबई

‘जर तुमचे क्रिकेटवर प्रेम असेल तर तुम्ही भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबणार नाही. जर तुम्ही त्या मार्गाने जाणार असाल तर तुमचे क्रिकेटवर प्रेम नाही असाच त्याचा अर्थ होतो. तुम्ही फक्त पैशासाठी क्रिकेट खेळत आहात, असाही निष्कर्ष त्यामुळे काढला जाईल. तुम्ही खरोखरच चांगले खेळलात तर आपोआपच पैसा तुम्हाला मिळेल,’ अशा शब्दांत भारताचा तडाखेबंद फलंदाज वीरेंदर सेहवागने तरुण क्रिकेटपटूंना दिला.

मन्सूर अली खान पतौडी व्याख्यानात सेहवागने आपल्या फलंदाजीतील मुक्त शैलीप्रमाणेच शब्दांचे तडाखेही दिले.

सेहवाग म्हणाला की, भ्रष्ट प्रवृत्ती ओळखा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला कुणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर बीसीसीआय किंवा आयसीसीला त्याची माहिती द्या. ते अगदी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेत तर ती व्यक्ती अन्य क्रिकेटपटूशी संपर्क साधेल आणि कदाचित ती त्याच्या जाळ्यात अडकेल. तेव्हा तुम्ही अशा गोष्टी त्वरित कळवा.

गेल्या वर्षी बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसनला दोन वर्षांसाठी बंदीला सामोरे जावे लागले. भ्रष्टाचाराबाबत आयसीसीला माहिती न दिल्याचा फटका त्याला बसला.

सेहवागने उत्तेजकासंदर्भातही कोरडे ओढले. उत्तेजकांच्या बाबतीत खेळाडूंनी काळजी घ्यायला हवी. प्रत्येक खेळाडूने उत्तेजक चाचणीला उपस्थित राहायला हवे. अनेक क्रिकेटपटू फिटनेसवर भर देत आहेत. पण स्नायू बळकट केल्यामुळे तुम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजीत सरस ठरू शकाल असे मला वाटत नाही. बीसीसीआयनेही उत्तेजकांसदर्भात १६ व १९ वर्षांखालील मुलांमध्ये प्रबोधन करायला हवे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here