राजस्थानविरुद्धच्या लढतीत धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सॅम करन, ऋतूराज गायकवाड यांना त्याने आपल्याआधी संधी दिली. मात्र त्याच्या या डावपेचांवर टीका झाली. धोनी आधी फलंदाजीला आला असता, तर अनुभवी फलंदाज फाफ डूप्लेसिसवरील अतिरिक्त ताण कमी झाला असता. धोनीने त्याच लढतीत अखेरच्या षटकांत षटकारांची आतषबाजी केली होती. तो आधीच फलंदाजीला आला असता, तर लढतीचा निकाल वेगळा लागला असता, असे जाणकार आणि त्याच्या पाठिराख्यांना वाटले होते.
मैदान मोठे…चेन्नईची राजस्थानविरुद्धची लढत शारजाला पार पडली होती. जिथे मैदान तुलनेत लहान आहेत. मात्र दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची लढत दुबईला होते आहे, जिथे मैदान मोठे आहे. अशा मोठ्या मैदानांवर स्कोअरबोर्ड हलता ठेवण्यासाठी एकेरी, दुहेरी धावा घेत राहणे महत्त्वाचे असते. धोनी जसा फटकेबाजीत हुशार आहे. तसाच तो धावा घेण्यातही कसलेला आहे.
अश्विनचे काय?दिल्लीने पंजाबवर मात करत सुरुवात छान केली; पण अश्विनचा खांदा दुखावला असून तो चेन्नईविरुद्ध खेळेल की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. गुरुवारच्या सरावाला अश्विन येणार होता. तिथे फिझिओ पॅट्रिक फरहार्त त्याची तपासणी करून योग्य तो निर्णय देणार होता. अशी माहिती दिल्लीचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक मोहम्मद कैफने दिली. अश्विन खेळला नाही, तर सीनियर स्पिनर अमित मिश्रला अक्षर पटेलसह संधी मिळू शकते. आतापर्यंत मिश्राने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील सर्वात जास्त हॅट्रिक्सही मिश्राच्या नावावर आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times