सध्याच्या घडीला सर्वाच्या मुखात राहुल तेवतिया हे नाव आहे. रविवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. राहुलने एकाच षटकात पाच षटकार लगावले आणि सचिन तेंडुलकर, युवराज सिंगसह आजी-माजी खेळाडूंनी राहुलचे कौतुक केले. पण हा राहुल तेवतिया नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या त्याची माहिती…

रविवारच्या सामन्याचा नायक राहुल ठरला. कारण राजस्थानचा संघ संजू सॅमसन बाद झाल्यावर पराभूत होणार, असे वाटत होते. पण राहुलने १८ व्या षटकात पाच खणखणीत षटकार लगावले आणि त्याने सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला. त्यानंतर हा राहुल नेमका आहे तरी कोण आणि त्याचा प्रवास नेमका कसा झाला, याबाबत चर्चा व्हायला सुरुवात झाली.

राहुलचा जन्म २० मे १९९३ साली हरियाणामधील सीही येथे झाला. राहुलला क्रिकेटची आवड होती. तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी उत्तमपणे करत होता. त्यामुळेच संघाला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला. राहुलने आतापर्यंत ५० ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या ५० सामन्यांमध्ये त्याने ६९१ धावा केल्या असून नाबाद ५९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचबरोबर ५० सामन्यांमध्ये त्याने ३३ विकेट्सही मिळवल्या आहेत.

राहुलची निवड २०१४ साली राजस्थान रॉयल्सच्या संघाने केली होती. पण त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या संघात त्याला स्थान दिले. पंजाबच्या संघात तो राही वर्षे होता. पण त्याला संधी मिळत नव्हती आणि तो प्रकाशझोतात येत नव्हता. त्यानंतर २०१८ साली दिल्ली कॅपिटल्स या संघाने राहुलला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. यावेळी रिकी पॉन्टिंग आपल्याला बरंच काही शिकवतील आणि चांगली संधी देतील, असे राहुलला वाटत होते. पण दिल्लीच्या संघात असताना मात्र तसे पाहायला मिळाले नाही.

राहुलला त्यानंतर राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात सामील करून घेतले आणि सध्याच्या घडीला तो हुकमी एक्का झाला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात जेव्हा राहुलला रॉबिन उथप्पाच्यापुढे फलंदाजीला पाठवले गेले, त्यावेळी साऱ्यांनीच भुवया उंचावल्या होत्या. कारण राहुलने यापूर्वी सामन्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे तो फक्त गोलंदाज आहे, असे चाहत्यांना वाटले होते. उथप्पा हा नावाजलेला फलंदाज आहे, त्याच्यापुढे पाठवून राजस्थानने मोठी चूक केली असे वाटत होते.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आऊट झाला तेव्हा राहुल फलंदाजीला आला. सुरुवातीला काही चेंडू राहुलला खेळता येत नव्हते. त्यावेळी राहुलला पाठवून राजस्थानच्या संघाने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला, असे म्हटले जात होते. पण स्थिरस्थावर झाल्यावर राहुलने जी झंझावाती फलंदाजी केली तिने सामन्याचे रुपच बदलले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here