या सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघाने दोन सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर हैदराबादचा संघ हा सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे, तर सातव्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे.
या सामन्यापूर्वी दिल्लीने दोन्ही सामन्यांत विजय मिळवले होते. त्यामुळे ते अव्वल स्थानावर विराजमान होते. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दुहेरी धक्के दिल्लीला बसले आहेत. एकतर त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि दुसरा म्हणजे त्यांना गुणतालिकेतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ दोन विजयांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
गुणतालिकेतमध्ये पहिल्या स्थानावर राजस्थान. दुसऱ्या स्थानावर दिल्ली आणि तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीचा आरसीबीची संघ आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आहे. मुंबई इंडियन्सने या गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे, त्यानंतर हैदराबादचा संघ पहिल्या विजयासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल होत आहेत, त्यामुळे या गुणतालिकेत अव्वल चार संघ कोणते राहणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने यावेळी दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच नावचवले. हैदराबादने दिल्लीपुढे ठेवलेले १६३ धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. पण रशिद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे यावेळी हैदराबादला स्पर्धेतील पहिला विजय साकारता आला. त्याचबरोबर दिल्लीचाही या हंगामातील हा पहिला पराभव ठरला आहे. रशिद खानने यावेळी चार षटकांमध्ये फक्त १४ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times