ऑस्ट्रेलियाकडून दणकून पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली याने स्वत:चं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणं घातक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोटमध्ये दुसऱ्या वनडेच्या आधी आपण आपल्या या रणनितीचा पुनर्विचार करू शकतो, असंही त्याने सांगितलं. टीम इंडियात केलेले फलंदाजीतले काही बदल तसेच शिखर धवन आणि के. एल. राहुल या दोघांना संघात स्थान देण्यासाठी कोहली चार नंबरवर खेळण्यासाठी आला होता.
भारतीय फलंदाजांची बॅटही मंगळवारच्या सामन्यात चमकली नाही आणि गोलंदाजांच्या बॉलचीही जादू चालली नाही. ऑस्ट्रेलियाने ही मॅच १० विकेट्सने खिशात घातली. कोहली सामना संपल्यानतंर प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘आम्ही यापूर्वीही यावर अनेकदा चर्चा करून झालो आहोत. ज्या प्रकारे राहुल फलंदाजी करत होता, ते पाहता आम्ही त्याला फलंदाजीच्या क्रमात फिट बसवण्याचा प्रयत्न केला. पण मी जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर उतरलो आहे, तेव्हा तेव्हा ते आमच्यासाठी योग्य ठरलेलं नाही. त्यामुळे याचा पुनर्विचार करायला हवा आहे.’
‘काही खेळाडूंना संधी द्यायची होती. लोकांनी हा पराभव सहजतेने घ्यायला हवा आणि एकाच सामन्यानंतर घाबरण्याची गरज नाही. मला थोडे प्रयोग करण्याची परवानगी आहे आणि काही वेळा मी अयशस्वी झालो आहे. त्यापैकी आजची संधी होती,’ असंही कोहलीने स्पष्ट केलं. ‘आम्ही तिन्ही स्तरावर कमकुवत ठरलो. ही ऑस्ट्रेलियाची खूपच मजबूत टीम आहे. तुम्ही चांगले खेळला नाहीत की ते नेहमी तुमच्यावर शिरजोर होतात. हे आम्ही पाहिलंय,’ असं त्याने सांगितलं.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News