अखेरच्या षटकांत आपल्या यॉर्करने प्रतिस्पर्ध्यांना उद्ध्वस्त करण्याचे तंत्र नटराजनने विकसित केले. त्याचे मार्गदर्शक जयप्रकाश म्हणतात, की त्याने जी मेहनत घेतली आहे, त्यामुळे मला त्याच्या आताच्या वाटचालीबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्याने इथवर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.
२०१७मध्ये त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळण्याची संधी मिळाली, पण आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी त्याला तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २०१८मध्ये तो हैदराबाद संघात आला. पण त्याला पहिला सामना खेळायला मिळाला तो यंदा. त्यात त्याने १४ आणि १८व्या षटकांत यॉर्करचा मारा करत प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडले.
तामिळनाडू संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अविनाश खंडेलवाल म्हणतात की, नटराजनकडे यॉर्कर टाकण्याची एक वेगळी खुबी आहे. विशेषतः दडपणाखाली असताना हे अस्त्र वापरणे कठीणही असते. पण त्याने हे अस्त्र अवगत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याने हे अस्त्र अनेकवेळा वापरले आहे. आयपीएलमध्ये आता त्याची प्रचीती येत आहे.
रोजंदारीवर काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा असलेला नटराजन आपल्या कुटुंबाबद्दल खूप हळवा आहे. आपल्या कुटुंबाला स्थिरस्थावर करण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या बहिणींचे शिक्षण, नव्या घराचे बांधकाम याकडे तो लक्ष देत आहे. एवढेच नाही तर आपल्या गावात त्याने अकादमीही उघडली आहे. तिथे उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. ज्यांच्यासह तो टेनिस बॉल क्रिकेट खेळला त्यांना मदतीचा हात देण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे. जी. पेरियास्वामी हा त्यातलाच एक खेळाडू. त्याने क्रिकेटमध्ये काही होईल अशी आशाच सोडली होती पण नटराजनने त्याच्या कुटुंबियांचे मन वळविले आणि तो क्रिकेटकडे परतला. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पेरियास्वामीने छाप पाडली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times