या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. यापूर्वी झालेल्या चार सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने तीन लढतींमध्ये विजय मिळवला होता, तर एक पराभव त्यांच्या पदरी पडलेला होता. चेन्नई, केकेआर, पंजाब या संघाना दिल्लीने पराभूत केले होते, तर हैदराबादकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आज दिल्लीच्या संघाने आरसीबीला धक्का दिला आणि त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीच्या संघाने आठ गुणांसह मुंबईच्या संघाला दुसऱ्या स्थानावर ढकलत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे हा सामना जिंकून अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी होती. यापूर्वी आरसीबीने हैदराबाद, मुंबई आणि राजस्थान या संघांवर विजय मिळवता आला होता, तर पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हा सामना आरसीबीसाठी महत्वाचा होता. पण या सामन्यात त्यांना दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीकडून कर्णधार विराट कोहली एकटा लढला. पण कोहलीला यावेळी आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. दिल्लीने आरसीबीपुढे १९७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग आरसीबीच्या संघाला करता आला नाही.
सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे, तर मुंबईचा दुसरा आणि आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत केकेआरचा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्सने पाचवे स्थान पटकावले आहे. गेल्या सामन्यात विजय मिळवल्यावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा संघ असून तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times