दुबई: यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ज्याच्या नावावर आहेत, तोच फलंदाज सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा संघ पराभव पत्करताना दिसत आहे. त्यामुळे या फलंदाजाने लवकर फॉर्मात यावं, अशीच इच्छा संघाची असेल. सातत्याने अपयशी ठरत असलेला हा खेळाडू आहे राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन.

या आयपीएलमधील सर्वात जास्त १६ षटकार संजूच्या नावावर आहेत. पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये संजूची बॅट चांगलीच तळपली होती. पण त्यानंतर मात्र संजू सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही राजस्थानला पराभव पत्करावा लागला. या सामन्यातही एक मोठा फटका मारताना संजू स्वस्तात बाद झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात संजूला फक्त पाच धावाच करता आल्या.

संजूने शारजाच्या मैदानात झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये तुफानी खेळी साकारली होती. पहिल्या सामन्यात संजूने ७४ धावा केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संजूच्या नावावर ८५ धावांची जबरदस्त खेळी होती. पण त्यानंतर संजूला चार सामन्यांमध्ये ५, ०, ४ आणि ८ अशाच धावा करता आल्या आहेत.

शारजामधील दोन सामन्यांमध्ये संजूने धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यानंतर संजूला भारतीय संघात का स्थान दिले जात नाही, यावर चांगलाच वाद रंगला होता. पण त्यानंतर संजूच्या फलंदाजीमध्ये सातत्या पाहायला मिळाले नाही. त्यामुळेच संजूच्या बाजूने बोलणाऱ्या चाहत्यांचा आवाज आता बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या गेल्या तीन मोसमांमध्येही संजूच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. पण संजूने फॉर्मात यावं आणि संघाला जिंकवावं, अशीच अपेक्षा चाहते करत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवला. दिल्लीच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. दिल्लीने राजस्थानपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग राजस्थानच्या संघाला करता आला नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here