दुबई, : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकिकडे आरसीबीचे फलंदाज अपयशी ठरत असताना कोहलीने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. कोहलीच्या या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीला चेन्नईच्या संघापुढे विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवता आले. कोहलीने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत ५२ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ९० धावांची खेळी साकारली.

आरसीबीच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण त्यांचा सलामीवीर आरोन फिंच या सामन्यातही अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या दीपक चहरने यावेळी फिंचला दोन धावांवर असताना बाद केले.

फिंच बाद झाल्यावर देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट कोहली यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही रचली. पण चेन्नईच्या शार्दुल ठाकूरला मोठा फटका मारण्याच्या नादात पडीक्कल बाद झाला. पडीक्कलला ३३ धावा करता आल्या. या षटकात आरसीबीला दुहेरी धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. कारण शार्दुलने या सामन्यात धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सलाही बाद केले, एबीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेला वॉशिंग्टन सुंदरही १० धावा करून बाद झाला.

एका बाजूने आरसीबीचे फलंदाज बाद होत असले तरी दुसरी बाजू कोहलीने चांगलीच धरून ठेवली होती. कोहलीने यावेळी आयपीएलमधील आपेल ३८वे अर्धशतकही पूर्ण केले. अखेरच्या षटकांमध्ये कोहली आणि शिवम दुबे यांनी चेन्नईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. अर्धशतक झळकावल्यावर कोहलीने धावांचा वेग कमालीचा वाढवला आणि चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here