दिल्लीच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी कर्णधार रोहित शर्माला लवकर गमावले. रोहितला यावेळी पाच धावाच करता आल्या. रोहित बाद झाल्यावर सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमली. डीकॉक यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत होता आणि दमदार फटकेबाजीच्या जोरावर डीकॉकने आपले अर्धशतकही साजरे केले. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच दिल्लीच्या आर. अश्विनने डीकॉकला बाद केले, त्याला ३६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावा करता आल्या.
डीकॉक बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी सूर्यकुमारने आपल्या खांद्यावर घेतली आणि फटकेबाजीला सुरुवात केली. सूर्यकुमारने चांगले फटके लगावत यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो जास्त काळ खेळू शकला नाही, त्याला दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कर्णधार श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारला यावेळी ३२ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५३ धावा करता आल्या.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर फलंदाजांना मोठी खेळी साकारता आल्याचे पाहायला मिळाले नाही. पण दिल्लीकर शिखर धवनने मात्र अर्धशतक झळकावले. धवनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीला मुंबईपुढे १६३ धावांचे आव्हान ठेवता आले. शिखर धवनने यावेळी ५२ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६९ धावांची महत्वाची खेळी साकारली.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी साव, संघात स्थान मिळालेला अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोण मोठी खेळी साकारतो, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण या तिघांपैकी एकालाही यावेळी अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पृथ्वीला बाद केले आणि दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीला यावेळी चार धावाच करता आल्या.
अजिंक्य रहाणेने यावेळी चांगली सुरुवात केली खरी, पण त्याला ३ चौकारांच्या जोरावर १५ धावा करता आल्या. त्यामुळे यावेळी मोठी खेळी साकारण्यात अजिंक्यलाही अपयश आले. कर्णधार अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन यांची जोडी यावेळी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण अय्यरला यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही. अय्यरने पाच चौकारांच्या जोरावर ३३ चेंडूंत ४२ धावा फटकावल्या. तिन्ही मुंबईकरांना यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही. पण दिल्लीकर धवनने मात्र या सामन्यात अर्धशतक झळकावले. धवनचे या आयपीएलमधील हे पहिले अर्धशतक ठरले. धवनने यावेळी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times