नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना दिसत नाही. पण चाहत्यांनी केलेल्या मतदानामध्ये धोनीचं ट्वेन्टी-२०चा किंग आहे, असे समोर आले आहे. धोनीने यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

स्पोर्ट्स फ्लॅश या रेडिओ चॅनेलने एक सर्वे केला होता. यामध्ये १२८ क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेमध्ये १२ लाख लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्वेमध्ये खेळाडूंची यापूर्वीची आणि आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर सर्वोत्तम खेळाडू निवडायचा होता. यामध्ये १२७ सामन्यांचा समावेश करण्यात आला होता. पण चाहत्यांना यावेळी भारतीय संघातून निवृत्ती पत्करलेल्या धोनीचं सर्वोत्तम खेळाडू असल्याचे वाटले आहे.

हा सर्वे एका स्पर्धेसारखा खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये उपांत्य आणि अंतिम फेरीही होती. यावेळी पहिल्या उपांत्य फेरीमध्ये धोनी आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांच्यामध्ये लढत होती, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. पहिल्या उपांत्य फेरीत धोनीने युवराजवर मात केली, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत कोहली रोहितवर भारी ठरला. त्यामुळे या सर्वेची अंतिम फेरी भारताचा माजी कर्णधार धोनी आणि सध्याच्या कर्णधार कोहली यांच्यामध्ये रंगली होती. पण चाहत्यांनी यावेळी कोहलीपेक्षा धोनीलाच सर्वात जास्त पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

याबाबत स्पोर्ट्स फ्लॅशचे संस्थापक रमण रहेजा यांनी सांगितले की, ” या सर्वेमधून एक गोष्ट सिद्ध होते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही चाहत्यांना धोनी हाच सर्वोत्तम खेळाडू वाटतो. धोनीने आतापर्यंत भारतीय संघासाठी जे काही केलेले आहे, ते चाहते अजूनही विसरू शकलेले नाहीत. त्यामुळे धोनीलाच चाहत्यांना यावेळी सर्वाधिक पसंती दिली. आम्ही ३२ दिवस हा सर्वे करत होतो, त्याचबरोबर या सर्वेला ४० लाख वेळा चाहत्यांनी पाहिले आहे. त्यामुळे क्रिकेटची लोकप्रियता केवढी आहे, हे यावरून आपल्याला समजता येऊ शकते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here