दुबई : मराठमोळा तुषार देशपांडे आपल्या पहिल्याच सामन्यात चमकल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना तुषार आज पहिलाच सामना खेळला. पण या सामन्यात तुषारने दिमाखदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यानंतर दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही यावेळी तुषारचे कौतुक केले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

या सामन्यात गोलंदाजी करताना तुषारने स्थिरस्थावर झालेल्या राजस्थानच्या बेन स्टोक्सला बाद केले. दिल्लीसाठी हे मोठे यश होते. कारण स्टोक्स हा स्थिरस्थावर झाला होता आणि चांगली फटकेबाजी करत होता. स्टोक्स बाद झाला नसता तर त्याने राजस्थानच्या बाजूने सामना झुकवला असता. पण तुषारने यावेळी स्टोक्सला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले.

पहिल्याच सामन्यात तुषारने डावातील अखेरचे षटकही चांगले टाकले. कारण या सामन्यात राजस्थानला जिंकायला २२ धावांची गरज होती. यावेळी राहुल तेवातिया हा जबरदस्त फटकेबाजी करत होता. पण अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंमध्ये त्याने फक्त चारच धावा दिल्या. त्याचबरोबर या षटकात राहुलचा एक झेलही टिपण्याची नामी संधी तुषारकडे होते. तुषार हा झेल पकडायलाही गेला. पण तुषारच्या मार्गात यावेळी राजस्थानचा फलंदाज श्रेयस गोपाळ आला आणि झेल पकडण्याची संधी हुकली. पण त्यानंतरही तुषार निराश झाला नाही. कारण या षटकाच्या अखेरच्या चेंडूंवर तुषारने श्रेयसला बाद करत आपला दुसरा बळी मिळवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आतापर्यंत दिल्लीच्या संघात तीन मुंबईच्या खेळाडूंना आपण पाहिले होते. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर यापूर्वी संघाकडून खेळताना आपण पाहिले आहे. पण या सामन्यात मुंबईच्या तुषारला संधी देण्यात आली. आतापर्यंत स्थानिक सामन्यांमध्ये तुषारने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याची निवड दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात केली होती.

तुषारने आतापर्यंत मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय अ संघाकडूनही तुषार खेळलेला आहे. त्यामुळे फार कमी वयात तुषारला चांगला अनुभव मिळालेला आहे. तुषार हा एक मध्यमगती गोलंदाज आहे, त्याचबरोबर तो डावखुरा फलंदाजही आहे. त्यामुळे संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा तो गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे दिल्लीच्या संघाने तुषारला संघात घेण्याचा निर्णय घेतला होता. पण तुषारनेही यावेळी संधीचे सोने केल्याचेच पाहायला मिळाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here