नवी दिल्ली: बीसीसीआयच्या वार्षिक करारात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान मिळाले नसल्याने धोनीयुगाचा अस्त झाल्याची चर्चा जोर धरत असतानाच धोनीसाठी भारतीय संघाचे दरवाजे अजूनही उघडे असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. धोनीला वार्षिक करारातून वगळण्याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली असून खेळाडूंचे वार्षिक करार आणि संघ निवड याचा दुरान्वयेही संबंध नाही. चांगली कामगिरी करून धोनी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.

बीसीसीआयने जे करार केले आहेत, त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या करारात स्थान मिळाले म्हणजेच भारतीय संघातील समावेशाची हमी मिळाली, असे होत नाही. बीसीसीआयच्या नियमानुसार नियमितपणे जे खेळाडू खेळत आहेत त्यांनाच नव्याने करारबद्ध केले जाते. धोनीच्या बाबतीत वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास धोनी २०१९च्या विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे नव्या करारामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही, असे या अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले.

धोनीसाठी आजही भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत. धोनीला राष्ट्रीय संघात परतायचे असेल तर चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवावे लागेल. धोनी संघात परतल्यास तो टी-२० विश्वचषकाचाही भाग असू शकतो, असेही हा अधिकारी म्हणाला. खेळाडूंचे वार्षिक करार आणि धोनीच्या क्रिकेटमधील भविष्याचा कोणताही संबंध नाही. यापूर्वी अनेक खेळाडू करारबद्ध नसतानाही भारतीय संघातून खेळलेले आहेत. भविष्यातही अशाप्रकारे कामगिरी पाहून खेळाडूंना संधी देण्यात येईल, असे हा अधिकारी म्हणाला. बीसीसीआयच्या करारावर बोट ठेवून त्याचे वेगळे अर्थ काढल्याने काहीच साध्य होणार नाही, असे नमूद करत या अधिकाऱ्याने माध्यमांच्या तर्कवितर्कांवर काहीशी नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराचा तपशील आज जाहीर केला. यात ए प्लस श्रेणीत कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आले आहे. गेल्यावेळी ए श्रेणीत असलेल्या महेंद्रसिंग धोनीला यावेळी करारबद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळेच धोनीपर्वाच्या अस्ताची चर्चा सुरू झाली आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here