शारजा: सध्याच्या युवकांचे कॉर्पोरेट नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. पण वयाच्या २६व्या वर्षीच त्याने कॉर्पोरेट नोकरी सोडली. कारण वेड होतं ते क्रिकेटचं. दुखापतीमुळे १२वीत असताना क्रिकेट सोडलं होतं. पण ऑफिसमध्ये मन रमत नव्हतं. त्यामुळे त्याने नोकरी सोडली आणि तो क्रिकेटकडे पुन्हा वळला. …अन् आता तो आयपीएलमध्ये फलंदाजांचा कर्दनकाळ ठरत आहे. महेंद्रसिंग धोनीलाही त्याने बाद करून दाखवलं आहे. ही गोष्ट आहे कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची.

वरुण सुरुवातीपासून क्रिकेट खेळायचा. क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम होतं. पण १७ वर्षांचा असताना वरुणला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला क्रिकेट सोडावं लागलं. त्यानंतर एका सर्वसाधारण मुलासारखा तो अभ्यास आणि त्यानंतर नोकरी करायला लागला. चेन्नईमध्ये त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तो आर्किटेक्ट झाला. त्यानंतर एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये त्याला चांगली नोकरीही मिळाली. पण कंपनीमध्ये मन रमत नव्हतं. त्याचं मन कुठेतरी क्रिकेटमध्येच अडकलेलं होतं. त्यामुळे त्याने नोकरी सोडली आणि तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये त्याची निवड झाली. या लीगमध्ये त्याने ९ सामन्यांमध्ये २२ विकेट्स मिळवल्या आणि तो प्रकाशझोतात आला.

तामिळनाडू लीगमध्ये चमकदार कामगिरी केल्यावर त्याला आयपीएमधील किंग्स इलेव्हन पंजाबच्याने ८ कोटी ४० लाख रुपये मोजत संघात घेतले होते. पण गेल्यावर्षी त्याला केकेआरने चार कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. या मोसमात केकेआरने त्याला संधी दिली आणि वरुणकडून अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. वरुणच्या गोलंदाजीमध्ये चांगलीच विविधता आहे. वरुण ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर आणि टॉप स्पिन असे विविध चेंडू तो टाकतो. आतापर्यंत सात सामन्यांमध्ये वरुणने सहा विकेट्स मिळवलेल्या आहेत.

या सर्व घडामोडींबाबत वरुण म्हणाला की, ” माझ्या आयुष्यात असा मोठा बदल होईल, याचा मी कधीही विचार केला नव्हता. दुखापतीनंतर मी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल का, असे मला वाटले नव्हते. पण मी क्रिकेटमध्ये यशस्वीपणे पुनरागमन करू शकलो, याचा मला आनंद आहे.” वरुणने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीला बाद केले होते. पण या सामन्यानंतर वरुणने धोनीबरोबर फोटोही काढल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर सामन्यानंतर वरुणला धोनीने शाबासकी दिल्याचेही पाहायला मिळाले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here