दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांना दिल्लीपुढे १८० धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकात दिल्लीला जिंकण्यासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी अक्षरने तीन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या पराभवानंतर धोनी म्हणाला की, ” अखेरच्या षटकात दिल्लीला जिंकण्यासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी ड्वेन ब्राव्हो हा जखमी झाला होता. त्यामुळे मी त्याला अखेरचे षटक देऊ शकत नव्हतो. त्यावेळी माझ्यापुढे फक्त दोन पर्याय होते. कर्ण शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांपैकी मला एकाला अखेरचे षटक द्यायचे होते. यावेळी मी जडेजाची निवड केली. पण माझ्यामते ही गोष्ट तेवढी योग्य ठरली नाही.”
पराभवाचे कारण सांगताना धोनी म्हणाला की, ” दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने चांगली फलंदाजी केली. आमच्यासाठी शिखरला बाद करणे सर्वात महत्वाचे होते. शिखरचे काही सोपे झेल आम्ही सोडले आणि तीच चूक आम्हाला सर्वात जास्त भोवली. कारण शिखरसारखा फलंदाज एकदा स्थिरस्थावर झाला तर तो मोठी खेळी साकारू शकतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शिखर धवनला जीवदान देणे आमच्यासाठी सर्वात जास्त महाग पडले.”
आतापर्यंत चेन्नईचा संघ ९ सामने खेळला आहे आणि त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. पण तरीही त्यांच्या बाद फेरीत पोहोचण्याचा आशा अजूनही कायम आहेत. आता चेन्नईचे पाच सामने अजूनही बाकी आहेत. त्यामुळे चेन्नईने जर पाच सामन्यांमध्ये विजय मिळवले तर त्यांचे १६ गुण होऊ शकतात. त्यामुळे अजूनही बाद फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जीवंत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times