किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात नरिनने निर्णायक षटक टाकले होते आणि केकेआरला विजय मिळवून दिला होता. पण या सामन्यानंतर नरिनची गोलंदाजी शैली अवैध असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर नरिनला ताकिद देण्यात आली होती. पण त्यानंतर आयपीएलमधील गोलंदाजी समितीने नरिनची गोलंदाजी पुन्हा पाहिली. यानंतर या समितीने नरिनला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे.
आयपीएलने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ” कोलकाता नाइट रायडर्स संघातील फिरकीपटू सुनिल नरिनची गोलंदाजी शैली अवैध असल्याची तक्रार करण्यात करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही नरिनला पहिली ताकिद दिली होती. पण त्यानंतर आमच्या गोलंदाजी समितीने नरिनच्या शैलीची तपासणी केली. त्याच्या गोलंदाजीचे काही व्हिडीओ पाहिले आणि त्याची समिक्षा केली. त्यानंतर आमच्या गोलंदाजी समितीने नरिनला आयपीएलमध्ये खेळण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नरिन आता आयपीएलमध्ये खेळू शकतो.”
नरिनला यापूर्वी २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते. कारण यावेळीही नरिनची गोलंदाजीची शैली तेव्हाही अवैध असल्याची तक्रार करण्यात आली होती. पण त्यानंतर २०१६ साली नरिनने आपली गोलंदाजीची शैली बदलली. त्यानंतर आयसीसीने त्याची नवीन गोलंदाजीची शैली पाहिली. त्यामध्ये आयीसीसीला गोलंदाजीतील कोणताही अवैध प्रकार दिसला नाही. त्यामुळे नरिनला पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २०१८ साली पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्येही नरिनच्या गोलंदाजी शैलीबाबत तक्रार करण्यात आली होती. पण त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई केल्याचे पाहायला मिळाले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times