मुंबईच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या डावाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा ९ धावांवर असताना बाद झाला. रोहितला यावेळी ९ धावांवर समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या सूर्य कुमार यादवला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. सूर्यकुमार बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनही सात धावा करून बाद झाला.
मुंबईला सुरुवातीलाच तीन धक्के बसले होते आणि त्यांची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कृणाल पंड्या आणि सलामीवीर क्विंटन डीकॉक यांनी यावेळी संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत होते. पण यावेळी पंजाबचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोइने कृणालला बाद करत ही जोडी फोडली. कृणालने यावेळी ३० चेंडूंत ३४ धावा केल्या.
कृणाल बाद झाला असला तरी डीकॉकने जबरदस्त फटकेबाजी सुरु केली होती. डीकॉकने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि मुंबईच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. डीकॉकच हे पाच खेळींमधले चौथे अर्धशतक ठरले. डीकॉक आणि हार्दिक पंड्या आता मोठी धावसंख्या उभारतील, असे वाटत होते. पण हार्दिकला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही, त्याला फक्त आठ धावाच करता आल्या. त्यानंतर काही वेळातच डीकॉकही बाद झाला आणि मुंबईला मोठा धक्का बसला. डीकॉकने यावेळी ४३ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times